अखेर १५ वर्षांनी नेहराने मागितली धोनीची माफी
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या १८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक सुवर्ण आठवणी आहेत. त्यापैकी एक म्हणजे २००५मधील पाकिस्तानचा भारत दौरा.
या दौऱ्यात ६ सामन्यांच्या वनडे मालिकेतील ५ एप्रिलला झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) आपल्या कारकीर्दीतील पहिले शतक ठोकले होते. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.
ही घटना त्या वेळची आहे, जेव्हा धोनीने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. पाकिस्ताविरुद्ध २००५मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या चौथ्या सामन्यात एक घटना घडली होती. त्यावेळी नेहरा (Ashish Nehra) धोनीला शिवी देतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता.
याबद्दल स्वत: नेहराने धोनीला शिवी दिल्याचा खुलासा केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २०१७मध्ये निवृत्ती घेणारा नेहरा म्हणाला की, "मला चांगल्याप्रकारे आठवते की, तो पाकिस्तानविरुद्धचा विशाखापट्टणम येथील दुसरा वनडे सामना होता. यामध्ये धोनीने शतकी खेळी केली होती. तेव्हाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मी धोनीला शिवी देत आहे. कारण धोनी आणि द्रविड (Rahul Dravid) यांच्या पहिल्या स्लिपमधून शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) झेल सुटला होता."
"लोकांना वाटतं की हा विशाखापट्टणमचा सामना आहे. परंतु हा सामना अहमदाबाद येथे झालेल्या चौथ्या सामन्यातील आहे. तरीही मी हे मान्य करतो की माझ्याकडून चूक झाली आहे," असेही नेहरा यावेळी म्हणाला.
यावेळी नेहरा मजेशीर अंदाजात म्हणाला की, हा व्हिडिओ व्हायरल झाला. कारण यामध्ये धोनीसारखा व्यक्ती होता. तरीही सामन्यानंतर कोणीही मला काही म्हटले नाही. कारण, सामन्यांमध्ये असे नेहमी होत असते. हा व्हिडिओ इतका प्रसिद्ध झाला कारण त्यामध्ये धोनी आहे."