Chikhali : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिखली गाव राहणार तीन दिवस बंद

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिखली गाव बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला आहे. यामध्ये केवळ रुग्णालये आणि मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत. हा बंद 10 ते 12 एप्रिल या कालावधीत राहणार आहे. संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांचा पुरवठा सुरू असतो. चिखलीकरांनी मात्र बंदच्या काळात केवळ दूध आणि वैद्यकीय सेवा सुरू ठेऊन अन्य किराणा, भाजीपाला या सेवा देखील बंद ठेवण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. चिखली ग्रामस्थांच्या वतीने चिखली पोलिसांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे चिखली परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामस्थांनी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार (दि. 10) ते रविवार (दि. 12 एप्रिल) या तीन दिवसांच्या कालावधीत गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

या कालावधीत केवळ मेडिकल आणि रुग्णालय सुरू राहणार आहेत. कुदळवाडी, पवार वस्ती, पाटीलनगर, घरकुल, देहू-आळंदी रस्ता या परिसरात नागरिक अधिक संख्येने बाहेर फिरतात. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. गावच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद बाबतची माहिती रिक्षा( एमएच 14, जीसी 7841) फिरवून दिली जाणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

'संचारबंदीच्या काळात किराणा दुकाने, भाजीपाला विक्री करणारी दुकाने आणि अन्य जीवनावश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने सुरू असतात. मात्र, चिखली गावातील नागरिकांनी स्वतःहून संचारबंदी आणखी कठोर करून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.' सतीश माने-वरीष्ठ पोलीस निरीक्षक , चिखली पोलीस ठाणे.

Sharing