ऐतिहासिक किल्ल्यातील नवीन भिंत ढासळली

ऐतिहासिक किल्ल्यातील नवीन भिंत ढासळली
किल्लेधारूर/प्रतिनिधी
शहरातील ऐतिहासिक किल्ल्यात बांधण्यात आलेली नवीन भिंत ढासळली असून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस पत्रकार सय्यद शाकेर यांनी केली आहे.
येथील ऐतिहासिक किल्ल्यात सुमारे सात वर्षापूर्वी राज्य पुरातत्व विभागाकडून किल्ल्याची डागडूजी करण्यास सुरुवात झाली होती. सदरील काम गायत्री कन्स्ट्रक्शन औरंगाबाद या खाजगी कंत्राटदाराकडून करण्यात आले. चार वर्षापूर्वी खारी दिंडी परिसरातील भिंत बांधण्यात आली. सदरील भिंतीचे काम निकृष्ट असल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या भेटी दरम्यान नागरिकांनी निदर्शनास आणून दिले होते. याच भिंतीच्या मधोमध भिंत ढासळण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या पावसात सदरील भिंत दिंडीच्या भागात ढासळली. सदरील नवीन भिंत ढासळल्यामुळे कामाचा निकृष्ट दर्जा समोर आला असुन पुरातत्व विभागाने तात्काळ या कामाची चौकशी करुन कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस पत्रकार सय्यद शाकेर यांनी केली आहे.