विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर 'कोरोना योद्धा' पुरस्काराने सन्मानित

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर 'कोरोना योद्धा' पुरस्काराने सन्मानित
औरंगाबाद/प्रतिनिधी
केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांना 'कोरोना योद्धा' पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी कोरोना संक्रमण काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याची यथोचित दखल घेऊन केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी कमलेश गायकवाड यांनी त्यांचा नुकताच 'कोरोना योद्धा' पुरस्कार देऊन यथोचित सन्मान केला आहे.
नाशिकला बदलून येण्यापूर्वी डॉ.दिघावकर यांनी मुंबई येथील कर्तव्यादरम्यान अहोरात्र परिश्रम घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता झोकून दिले होते. परप्रांतीय मजूर आजाराच्या भीतीने शहरातून प्रचंड संख्येने स्थलांतर करत असताना डॉ.दिघावकर यांनी काटेकोर यंत्रणा राबवून या मजुरांच्या राहण्या-खाण्याची तसेच प्रवासाची शक्य होईल तितकी सोय करण्यावर भर दिला. त्यामुळे या मजुरांच्या मनात महाराष्ट्र राज्याबद्दल वेगळीच आपुलकी निर्माण झाल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले. यादरम्यान नागरिकांना कोरोना आजारापासून बचाव करण्याबाबत जनजागृतीद्वारे सचेत केले. त्याचबरोबर लोकांची लॉकडाऊनमुळे गैरसोय होऊ नये यासाठी यंत्रणाही डॉ.दिघावकर यांनी राबविल्याचे दिसून आले. नाशिकला बदलून आल्यानंतर कुठे पदभार स्वीकारत नाहीत तोच कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्हावार कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्याप्रमाणे उपाययोजना राबविण्यावर त्यांनी विशेष भर दिल्याचे पहावयास मिळाले.
डॉ.दिघावकर यांच्या याच लोकाभिमुख कार्याची दखल घेऊन केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर यांनी सूचित केल्यावरून राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी डॉ.दिघावकर यांचा त्यांच्या शासकीय कार्यालयात 'कोरोना योद्धा' पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
