सातवी आर्थिक गणनेचे काम वेगात पूर्ण करावे- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

सातवी आर्थिक गणनेचे काम वेगात पूर्ण करावे- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड/प्रतिनिधी
सातवी आर्थिक गणना अंतर्गत प्रगणकांनी सक्षमतेने कालमर्यादेत सर्वेक्षण पूर्ण करावे. हे काम राष्ट्र विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून यामध्ये चुकीचे काम करणाऱ्यां वर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले
जिल्हास्तरीय स्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे एस. व्ही. बनसोडे, श्री. मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी अपर्णा गुरव, तसेच केंद्र शासनाच्या सांखिकी विभाग, पोलीस, माहिती तंत्रज्ञान, सीएससी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सातव्या आर्थिक गणने अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामाचा सर्वंकष आढावा घेतला. या प्रसंगी ग्रामीण क्षेत्रामध्ये 77 टक्के आणि शहरी क्षेत्रात फक्त 20 टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसून आले. जिल्ह्याचा व सर्व समाज घटकांच्या विकासाच्या नियोजनासाठी हे सर्वेक्षण येत्या दोन महिन्यात पूर्ण होणे गरजेचे आहे.
सर्वेक्षणाच्या कामांमध्ये प्रगणक गैरहजर असतील अशांवर कारवाई करून नवीन प्रगणकांच्या नियुक्त्या केल्या जाव्यात तसेच यासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायत आणि शहरी भागात नगरपालिकेच्या सहकार्याने सर्वे पूर्ण केला जावा अशा सूचना देण्यात आल्या. काही ठिकाणी एन.आर.सी व कॅब या बाबत कारण पुढे करून नागरिक माहिती देत नाहीत असे सांगण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सातव्या आर्थिक गणनेचा आणि एनआरसी चा काहीही संबंध नसून नागरिकांनी आर्थिक गणनेसाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.
