निस्वार्थी अजातशत्रू अवलिया गेला .....!

निस्वार्थी अजातशत्रू अवलिया गेला .....!
हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी नाव असलेला निस्वार्थी, अजातशत्रू, अवलिया माणूस वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी प्रथमच आलेल्या हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने आपल्यातून निघून गेला. नियतीने आकस्मिकपणे या साध्या, सरळ, सोज्वळ, भावनिक आणि माणुसकी जपणाऱ्या अवलिया माणसाला आपल्यातून हिरावून नेले. हा माणूस समज आल्यापासून सातत्याने समाजाविषयी असलेल्या पोटतिडकीने समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमी पुढाकार घ्यायचा परंतु पाठीमागे कुणाची दानत नव्हती आणि कुटुंबात ही एकटा पुरुष व कफल्लकता पाचवीला पुजलेली असल्याने अनेक कार्यकर्ते या माणसाकडे आले आणि गेले परंतु कुणीही टिकून राहिले नाही. म्हणून हा माणूस राजकारण आणि समाजकारणात एकटाच मुशाफिरी करत राहिला. अलीकडच्या काही वर्षात मात्र एआयएमआयएम पक्षाने या माणसातील वक्त्याला बऱ्यापैकी मंच उपलब्ध करून दिला होता. मान-सन्मान दिला एवढाच काय तो अपवाद. नाहीतर वयाचे अर्धशतक पार करेपर्यंत आर्थिक कफल्लकतेमुळे या माणसाच्या नशिबी दुर्लक्षित जिणेच आले.
अशा या अवलिया माणसाच्या संपर्कात मी सन २०१६ साली प्रथमच आलो. रेड्डी साहेब माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठे असल्याने मला माझ्या मोठ्या भावासारखे झाले. म्हणून मी आदराने नेहमी त्यांना रेड्डी साहब याच नावाने संबोधायचो. तसे मी माझ्या लहानपणापासून त्यांना ओळखायचो मात्र त्या अगोदर कधी आमचे बोलणे झाले नाही, की ओळखही नव्हती. परंतु मी २०१४ सालापासून वृत्तपत्रांमध्ये मुक्त पत्रकार म्हणून बातम्या आणि लेख लिहिण्यास सुरुवात केली. तेव्हापासून वृत्तपत्रात प्रकाशित होत असलेल्या माझ्या बातम्या व लेख रेड्डी साहेबांनी आवर्जून वाचायला सुरुवात केली. आणि २०१६ च्या जानेवारी महिन्यामध्ये असाच एक दिवस बशीरगंज चौकात असलेल्या माजी नगरसेवक जमीलभाई यांच्या पान दुकानावर माझा लेख प्रकाशित झालेले दैनिक लोकदिशा हे वृत्तपत्र घेण्यासाठी गेलो असता तिथे रेड्डी साहेब माझ्याजवळ आले आणि त्यांच्या स्वभावानुसार प्रथम स्वतःची ओळख करून दिली. मी त्यांना म्हटले की, मी आपल्याला लहानपणापासून ओळखतो परंतु कधी बोलणे झाले नाही. यावर त्यांनी सांगितले की, मी तुमच्या आजोबा पासून सर्वांना ओळखतो तुम्ही लिहिलेल्या बातम्या व लेख ही वाचतो. चांगलं लिखाण करता. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही मी चंपावतीरत्न पुरस्काराचे वितरण करणार आहे. त्यात यावेळी आदर्श पत्रकारिता पुरस्कारासाठी तुमची निवड केली आहे. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यांनी इतर पुरस्कारदात्यांसारखे माझ्याकडून ना प्रस्ताव मागितले, ना अर्ज मागितला. शिवाय मी कुठल्याही वृत्तपत्राशी जोडला गेलेलो नसतानाही फक्त माझ्या लिखाणाची नोंद घेत त्यांनी माझी या पुरस्कारासाठी निवड करून २०१६ च्या मार्च महिन्यात हॉटेल नीलकमल येथे पुरस्कार वितरण समारंभामध्ये मला पुरस्कार देऊन सन्मानित केले. तेव्हापासून त्यांचे व माझे ऋणानुबंध जुळले ते त्यांच्या जग सोडेपर्यंत कायम राहिले.
रेड्डी साहेब राजकारण आणि समाजकारण अशा दोन्ही मध्ये नेहमी सततपणे सक्रिय राहायचे. जनहितास्तव कोणतेही आंदोलन असो, कोणत्याही पक्षाचे असो, जनतेच्या भल्यासाठी असेल तर ते सर्वात अगोदर त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जातीने हजर राहायचे. जनहितासाठी ते कधीही पक्षीय राजकारणात अडकले नाही. जिथे जनहित तिथे हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी उपस्थित, असा त्यांचा होरा असायचा. परळी-बीड-अहेमदनगर या रेल्वे लाईन साठी सुद्धा त्यांच्या हयातीत जेवढी आंदोलने झाली, त्या सर्व आंदोलनांमध्ये त्यांनी हिरिरीने सक्रिय सहभाग नोंदविला होता. अत्यंत अल्पसंख्य असलेल्या ख्रिश्चन समाजासाठी, समाजाच्या उद्धारासाठी मदर टेरेसा आर्थिक विकास महामंडळ निर्माण करून द्यावे, याकरिता त्यांनी बीड ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा काढला होता. त्यांच्या हयातीत तर शासनाने यावर कोणतेही कार्य केलेले नाही. निदान त्यांच्या निधनानंतर तरी शासनाने हे महामंडळ स्थापन करून ख्रिश्चन समाजाला न्याय द्यावा आणि रेड्डी साहेबांना श्रद्धांजली ही.
समाजात असलेल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले कार्य करणाऱ्या रत्नांना ते आपल्या नजरेतून बरोबर हेरायचे आणि त्यांना सर्वांसमक्ष मंचावर बोलावून पुरस्कार देत सन्मानीत करायचे. यावेळी सुद्धा त्यांनी अशाच काही रत्नांना हेरून त्यांना चंपावतीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे नियोजन केले होते. सगळ्यांचे शील्ड (ट्रॉफी) व प्रमाणपत्र सुद्धा तयार करून ठेवले होते. मात्र कोरोनामुळे कार्यक्रम लांबत गेला आणि हा कार्यक्रम घेण्याअगोदरच त्यांचे निधन झाले. आता त्यांच्या पश्चात त्यांचे जिवलग मित्र प्रवीण पालीमकर आणि एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शेख शफिक भाऊ आणि आम्ही सर्वजण मिळून हा कार्यक्रम घेऊ आणि त्यांनी निवडलेल्या रत्नांना पुरस्कार देऊन सन्मानित करू. मात्र या कार्यक्रमात ते नसतील याचे मोठे दुःख राहणार आहे.
*वृत्तपत्रांच्या संपादकांबद्दल होती कमालीची आस्था!*
लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ म्हणून सर्व परिचित असलेले वृत्तपत्र क्षेत्र चालविणाऱ्या संपादकांबद्दल त्यांना कमालीची आस्था होती. विशेष करून स्थानिक वृत्तपत्रे चालविणारे संपादक हे कशा अडीअडचणीतून तारेवरची कसरत करत वृत्तपत्र चालवितात याविषयीही ते नेहमी भरभरून बोलायचे. त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या संपादकांसमोर ते नतमस्तक व्हायचे. यामध्ये मोतीरामजी वरपे, नामदेवरावजी क्षीरसागर, गम्मत भाऊ भंडारी, नरेंद्रजी कांकरीया, सर्वोत्तमजी गावरस्कर, विजयराजजी बंब, दिलीपजी खिस्ती, शिवाजीराव रांजवन पाटील, आगवान मामा, ईसाक अहेमद, अब्दुल खालेक पेंटर यांचा समावेश होता. तर वयाने लहान असलेल्या संपादकांमध्ये अजित वरपे, शेख तय्यब, राजेंद्र होळकर, शेख मुजीब, अभिमन्यू घरत, वैभव स्वामी आदी संपादकांनाही ते तेवढाच मान-सन्मान द्यायचे. त्यांना पत्रकारितेबद्दल कमालीची आस्था होती. म्हणून त्यांनी दैनिक शोले नावाचे वृत्तपत्र सुद्धा काही काळ चालविले परंतु आर्थिक गणित न जुळल्याने ते बंद पडले होते. पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संपादक, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार यांना नियमितपणे पुरस्कार देऊन गौरवित असत.
राजकारण आणि समाजकारणामध्ये सतत संघर्ष करणाऱ्या या अवलियाच्या अंगभूत सुप्तगुणांना खऱ्या अर्थाने संधी दिली ती एआयएमआयएम पक्षाचे प्रथम बीड जिल्हाध्यक्ष बनलेल्या शेख निजाम यांनी. त्यांनी रेड्डी साहेबांच्या अंगी असलेले सामाजिक व राजकीय ज्ञान ओळखून त्यांना पक्षाचे बीड जिल्हा प्रवक्ता पद दिले. रेड्डी साहेबांनीही या पदाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रवक्ता म्हणून जेव्हा-जेव्हा पक्षाच्या मंचावरून घेण्यात येणाऱ्या सभेमध्ये ते भाषण करायला उभे राहायचे तेव्हा सभेतील उपस्थितांना ज्ञानात भर घालणारी भाषणे ऐकायला मिळायची. यामुळे बघताबघता एआयएमआयएम पक्षाची धडाडणारी तोफ म्हणून रेड्डी साहेब गेल्या काही वर्षांपासून अत्यंत लोकप्रिय झाले होते. शेख निजाम यांच्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद मिळालेले ॲडव्होकेट शेख शफिक भाऊ यांनीही रेड्डी साहेबांचीच पुन्हा एकदा जिल्हा प्रवक्ता पदी निवड करून त्यांना पक्षात किती महत्त्व आहे हे दाखवून दिले होते. यामुळे रेड्डी साहेबांना समाजकारणासह राजकारणातही चांगले दिवस येणार असे वाटत असतानाच नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून नेल्याने एआयएमआयएम पक्षाचेच नाही तर समाजाचेही मोठे नुकसान झाले आहे.
*रेड्डी साहेब काय चीज होते हे, दफनविधी वेळी दिसून आले*
एरवी समाजकारण असो की राजकारण आर्थिक कफल्लकतेमुळे त्यांना गंभीरतेने न घेणाऱ्या इतर पक्षीय नेत्यांनी रेड्डी साहेबांच्या दफनविधी वेळी दर्शविलेली उपस्थिती ते किती महान होते हे दर्शवून गेली. दफनविधी नंतर घेतलेल्या शोकसभेत जवळपास प्रत्येक राजकीय पक्षातील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. त्यांचे बालपणीचे मित्र इतिहासकार, नाटककार, प्रा. डॉ. सतीश साळुंखे सरांनी केलेल्या मर्मस्पर्शी भाषणाने फक्त तेच गहिवरले नाहीत तर त्यांना बोलतांना आपल्या अश्रूंवर ताबा ठेवता आला नाही. रडत-रडतच त्यांनी आपल्या या बालपणीच्या मित्रा विषयी मन मोकळे केले. रेड्डी साहेबांच्या जाण्याने त्यांची ही अवस्था पाहून उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यांतून सुद्धा घडाघडा पाणी वाहिले. उपस्थितांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या या अश्रूंमुळे पुन्हा एकदा रेड्डी साहेबांच्या महानतेवर शिक्कामोर्तब झाले.
दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी संध्याकाळी ०९.०० वा. दरम्यान जग सोडून गेलेल्या रेड्डी साहेबांची आता अनेक जण आठवण काढीत आहेत. त्यांच्याविषयी भरभरून बोलत आहेत. हे पाहून अनायासे या दोन ओळी सहजच मनात येतात -
यह कैसा मुल्क है, यह कैसी रीत है।
याद करते है हमें, लोग क्युँ मरने के बाद .....!