'मूकनायक' हे पाक्षिक अन्यायाने दबलेल्या, खचलेल्या मुक्या लोकांचा आवाज होते - प्रा.डॉ.संजय पाईकराव

'मूकनायक' हे पाक्षिक अन्यायाने दबलेल्या, खचलेल्या मुक्या लोकांचा आवाज होते - प्रा.डॉ.संजय पाईकराव
बीड/प्रतिनिधी
मूकनायक हे पाक्षिक अस्पृश्य आणि बहिष्कृत समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते ते अन्यायाने दबलेल्या, खचलेल्या मुक्या लोकांचा आवाज होते असे मत प्रा.डॉ.संजय पाईकराव यांनी व्यक्त केले ते देवगिरी प्रतिष्ठाण संचलित,तुलसी शैक्षणिक समूह आयोजित ३१ जानेवारी रोजी मूकनायक दिन सोहळा निमित्त तुलसी सभाग्रह बीड येथे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुनील डोंगरे (उपसंपादक, पुण्यभूमी, बीड)रमाकांत गायकवाड (उपसंपादक, सायं.दैनिक रिपोर्टर, बीड) यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांचा पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य उमा जगतकर,प्राचार्य अश्विनी बेद्रे, प्राचार्य देविदास निकाळजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना औरंगाबाद येथील प्रसिद्ध व्याख्याते तथा इतिहास संशोधक प्रा.डॉ.संजय पाईकराव म्हणाले की,३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे पांडुरंग भटकर नावाच्या शिक्षित तरुणाला या पाक्षिकाचे संपादक केले कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादकपदावर कार्य करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी २,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली होती.आंबेडकरांनी मूकनायक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा किंवा लोकभाषा होती आणि बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र कर्मभूमी महाराष्ट्र होते.त्याकाळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीच समजू शकत होती. या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे.सध्या मूकनायकाचे १९ अंक उपलब्ध आहेत. त्यांत आंबेडकरांनी वैचारिक लिखाण केले.मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव निर्माण केली आहे असे प्रा.डॉ.संजय पाईकराव यांनी आपल्या व्याख्याना दरम्यान सांगितले. त्यांनी संवाद कौशल्य,सम्राट अशोकाच्या कालखंडातील शिलालेख,फुले-शाहू-आंबेडकर यांचा वैचारिक वारसा, सावित्रीबाई फुले यांच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे, समाज सुधारक राजाराम मोहनराय, टिळक,आगरकर, बाळशास्त्री जांभेकर आदींच्या कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे आयोजन तुलसी इंग्लिश स्कूल, बीड, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीड,तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ अग्रवाल यांनी केले. प्रास्ताविक सरकटे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार मोहिनी मसूरे यांनी मानले.यावेळी तुलसी शैक्षणिक समूहातील प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
