हिजाब प्रकरणी कर्नाटक राज्याच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या - शेख मोहसीन

Beed

हिजाब प्रकरणी कर्नाटक राज्याच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या - शेख मोहसीन

बीड/प्रतिनिधी

हिजाब प्रकरणी कर्नाटक राज्याच्या उडुपी शहरातील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेज मध्ये एका विद्यार्थिनीला तेथील विद्यार्थ्यांनी जो त्रास दिला त्याबाबत तेथील शिक्षणमंत्र्यांनी दोन दिवस उलटूनही अद्याप कुठलीही कारवाई न केल्याने अशा शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन बुर्‍हानुद्दीन आणि सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

याविषयी पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नुकतेच कर्नाटकातील उडुपी शहरातील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीला काही धर्मवेड्या अंधभक्तांनी घेराव घालून तिने हिजाब काढावा याकरिता मोठमोठ्याने नारेबाजी करत दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. हे वातावरण निर्माण होण्यामागे संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांचा ही हात आहे. कारण सदरील विद्यार्थिनीने  महाविद्यालयात प्रवेश केल्यावर तिला महाविद्यालयात धर्मवेड्या विद्यार्थ्यांसह महाविद्यालय प्रशासनाने अडविले होते. महाविद्यालय प्रशासनाची ही तऱ्हा पाहून महाविद्यालय प्रांगणात जमलेल्या अंधभक्त विद्यार्थ्यांना जास्तच चेव आला आणि त्यांनी नारेबाजी करत सदरील विद्यार्थिनीला घेराव घालून हिजाब काढण्यासाठी नारेबाजी करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नाला महाविद्यालय प्रशासनातील प्राचार्य आणि प्राध्यापक वर्ग यांच्या भूमिकेमुळे बळ मिळाले. शिवाय दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण होण्यास कारण मिळाले. तसेच सदरील विद्यार्थिनीवर हिजाब काढण्यास जबरदस्ती करणाऱ्यांवर आतापर्यंत कुठलीही कारवाई केल्याचे कळाले नाही. यामुळे या एकूण सर्व प्रकरणात महाविद्यालय प्रशासनासह राज्याचे शिक्षणमंत्री सुद्धा दोषी असल्याचे दिसत आहे. सदरील घटना उलटून बराच कालावधी गेला तरीही शिक्षणमंत्री या प्रकरणावर कोणतीही भूमिका घेत नाही, कारवाई करत नाही. तसेच आपला देश स्वतंत्र झाल्यापासून ते आतापर्यंत जवळपास पाऊण शतकाचा काळ लोटला आहे. परंतु यापूर्वी कधीही हिजाब किंवा बुरखा साठी अशाप्रकारे अन्य धर्मातील कुणी आंदोलन वगैरे केल्याचे ऐकिवात नाही. शिक्षण देणाऱ्या ज्ञान मंदिरात आतापर्यंत असा धर्मवेडेपणा झालेला नव्हता.  अलीकडच्या काळात धर्मवेड्यांची व अंधभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर कठोर कारवाई हाच एकमेव मार्ग आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्वांची कसून चौकशी व्हायला हवी. दोषी असणाऱ्यांना कडक शासन व्हायला हवे. जेणेकरून पुढे चालून भविष्यात कोणीही धर्मवेडे किंवा अंधभक्त अशा प्रकारची कृती करण्यास धजावणार नाही. असे निवेदनात नमूद केले असून निवेदनावर शेख मोहसीन बुर्‍हानुद्दीन यांच्यासह इमरान अब्दुल गफ्फार, शेख अथर अकबर, सलीम मुस्तफा शिकलगार, इनामदार आखेब, शेख मुहम्मद युसूफ़ यांची नावे व सह्या आहेत.

 

 

Sharing

Visitor Counter