युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातलगांनी तहसिल, उपविभागीय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा - जिल्हाधिकारी

Beed

युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातलगांनी तहसिल, उपविभागीय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा - जिल्हाधिकारी

बीड/वार्ताहर 

रशिया व युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युद्ध घोषित केले असून या परिस्थितीत बीड जिल्ह्यातील कोणाच्या घरचे नातलग, नागरीक युक्रेनमध्ये अडकलेले असल्यास तात्काळ जिल्ह्यातील त्यांच्या परिवारातील सदस्यांनी तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक ती नाव व इतर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी, बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जेणेकरुन जिल्ह्यातील जे कोणी नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांना सुखरूपपणे भारतात परत येता यावे यादृष्टिने महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारशी संपर्क साधून मदतीची यंत्रणा तत्पर ठेवली आहे. हे लक्षात घेता बीड जिल्ह्यातील जर कोणाचे नातलग, कुटुंबातील सदस्य, विद्यार्थी युक्रेनमध्ये असतील त्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ही समन्वयाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणी अडकले असल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबतची कार्यवाही करता येईल. नातलगांसाठी तहसिल कार्यालयासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री नंबर 1950 किंवा (02442)222604 या क्रमांकावर संपर्क साधावा.

अधिक मदतीसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली येथे नागरिकांच्या माहितीसाठी व मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून तेथील हेल्पलाईन नंबर पुढीलप्रमाणे आहेत. १८००११८७९७ (टोल फ्री), +९१-११-२३०१२११३, +९१-११-२३०१४१०४, +९१-११-२३०१७९०५ आहे व फॅक्स नंबर +९१-११-२३०८८१२४ हा आहे व तेथील ई-मेल आय डी situationroom@mea.gov.in हा आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी कळविले आहे. 

 

 

Sharing

Visitor Counter