विकास आणि वारसा दोन्ही सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न हवेत- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

विकास आणि वारसा दोन्ही सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न हवेत- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण
पुणे/वार्ताहर
देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विकास होत असताना विकास आणि देशाचा वैभवशाली प्राचीन वारसा सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
देहू येथे आयोजित जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील, वारकरी संप्रदायाचे मारुतीबाबा कुरेकर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, तुषार भोसले आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री म्हणाले, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक असल्याचा आपल्याला अभिमान आहे, याचे श्रेय भारतीय संत परंपरेला आणि ऋषी मुनींना आहे. राष्ट्रीय ऐक्य मजबूत करण्यासाठी आपली प्राचीन ओळख आणि परंपरेचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. भारत ही संतांची भूमी असल्याने या देशाचा विचार शाश्वत आहे. प्रत्येक काळात महापुरुषांनी जन्म घेऊन आपल्या शाश्वत मूल्यांचे रक्षण केले आणि देश व समाजाला मार्गदर्शन केले. समाजातील अखेरच्या व्यक्तींचे कल्याण करावे हाच संतांचा संदेश आहे. या संदेशानुसार गरिबांचे कल्याण ही देशाची प्राथमिकता आहे.