लाखो रुपये खर्च करून बनविलेले बाजारतळ विक्रेत्यांना भावले नाही !

लाखो रुपये खर्च करून बनविलेले बाजारतळ विक्रेत्यांना भावले नाही !
भाजीपाला विक्री पुन्हा रस्त्यावरच;बाजारतळाचे रूपांतर वाहनतळात
बीड/प्रतिनिधी
दिनांक ७ ऑगस्ट रोजी भाजी मंडई मध्ये नेहमीप्रमाणे रविवारचा बाजार भरला मात्र बीड नगरपरिषदेने लाखो रुपये खर्चून काही दिवसांपूर्वीच काँक्रिटीकरण करून बनविलेला बाजारतळ भाजीपाला विक्रेत्यांना भावला नसल्याचे दिसून आले. नवीन बनविण्यात आलेल्या बाजारतळात विक्रेत्यांऐवजी असंख्य मोटारसायकली लावण्यात आल्याने नवीन बाजार तळाचे रूपांतर वाहन तळ्यात झाल्याचे दिसून आले. शिवाय नेहमीसारखी स्वच्छतेचीही ऐशीतैशीच असल्याचे मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
बीड नगर परिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी रस्त्यावर बसून भाजीपाला विकणाऱ्यांना बसायला चांगले बाजारतळ हवे ही बाब लक्षात घेऊन विशेष लक्ष देत भाजी मंडई मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत लाखो रुपये खर्च करून काँक्रिटीकरण करून दिले. या नवीन बाजारतळामुळे आता भाजीपाला विक्रेते रस्त्यावर बसून भाजीपाला विकण्याऐवजी या चांगल्या ऐसपैस असलेल्या बाजारतळात बसून विकतील असे वाटले होते. परंतु दिनांक ७ ऑगस्ट रोजी रविवारच्या दुसऱ्याच बाजारात या वाहन तळाकडे भाजीपाला विक्रेत्यांनी पाठ फिरवली व नेहमीप्रमाणे भाजी मंडईत जेवढे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरच बाजार भरविला. यामुळे नेहमीप्रमाणे रस्त्यांवरून ये-जा करताना लोकांना पुन्हा पहिल्यासारखाच त्रास होत होता. परंतु याचे कुठलेही सोयरसुतक भाजीपाला विक्रेत्यांना नसल्याचे दिसून आले. नवीन बनविण्यात आलेल्या बाजारतळाबाबत काही भाजीपाला विक्रेत्यांना बोलते केले असता त्यांचे म्हणणे आले की, ग्राहक रस्त्यावरच भाजीपाला खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मध्यभागी बनविलेल्या बाजारतळात येत नाहीत. शिवाय दररोजचा उरलेला टाकाऊ भाजीपाला सर्वजण त्याच ठिकाणी टाकतात. ती घाण बीड नगरपरिषदेकडून दररोज उचलली जात नाही. यामुळे ही तिथे बसून भाजीपाला विकण्यास विक्रेते तयार होत नाहीत. कारणे काहीही असो परंतु लाखो रुपये खर्च करून बनविण्यात आलेल्या बाजारतळाकडे मात्र भाजीपाला विक्रेत्यांनी पाठ फिरविल्याने ते त्यांना भावले नसल्याचे दिसून आले. शिवाय त्या बाजारतळावर मोठ्या प्रमाणात मोटार सायकली लावण्यात येत असल्याने तसेच उरलेला टाकाऊ भाजीपाला बीड नगरपरिषद स्वच्छता विभागाकडून दररोज उचलला जात नसल्याने मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांचा हा बाजारतळ बनविण्यामागे असलेला चांगला हेतू फळद्रूप होऊ शकला नाही. अशी खंत ही मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून नमूद केली आहे.
