शासकीय बालगृह अधिक्षक यांना निलंबित करा;बाल हक्क संरक्षण संघाची मागणी

Beed

शासकीय बालगृह अधिक्षक यांना निलंबित करा;बाल हक्क संरक्षण संघाची मागणी; आदिवासी बालकांशी अमानुष वागणूक प्रकरण:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

बीड/वार्ताहर 

बीड शहरातील रस्त्यांवर भिक मागणा-या आदिवासी पारधी समाजातील ६ मुलांना बालहक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी शासकीय बालगृहात दाखल केले होते. मात्र त्याठिकाणचे कर्मचारी,केअर टेकर आणि अधिक्षक यांनी या मुलांना मारहाण केली,विशेष धक्कादायक आणि गंभीर बाब म्हणजे संडास-बाथरूम,भांडी घासायला आणि फरशी पुसायला लावले तसेच काम नाही केले तर जेवण देत नव्हते असे माध्यमास सांगितले. या संदर्भात दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री,महिला व बालकल्याण मंत्री,अध्यक्ष मानवी हक्क आयोग,बाल हक्क संरक्षण आयोग आदिंना निवेदन देण्यात आले. 

 

बाल हक्क संरक्षण आयोग सदस्य अड.प्रज्ञा खोसरे यांच्या मार्फत अध्यक्षांना निवेदन 

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग सदस्या अड. प्रज्ञा खोसरे यांच्या मार्फत अध्यक्ष बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून जबाबदार आधिकारी शासकीय बालगृह अधिक्षक नितिन ताजनपुरे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करत जिल्हाधिकारी बीड यांना दि.२९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असून निवेदनावर कार्याध्यक्ष बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर र,जिल्हाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर,सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्तपत्रकार संतोष ढाकणे आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.

Sharing

Visitor Counter