ओझोनच्या थराचे संरक्षण जबाबदारी नसून प्रत्येकाचे कर्तव्य - राहुल मोरे

ओझोनच्या थराचे संरक्षण जबाबदारी नसून प्रत्येकाचे कर्तव्य - राहुल मोरे
बीड/प्रतिनिधी
ओझोन थर सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले रक्षण करतो आणि वातावरणात संतुलन राखतो.परंतु मानवनिर्मित प्रदूषणामुळे ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी होत आहे. जो पर्यावरणाला विनाशकारी ठरू शकतो. जर सूर्यावरील अतिनील किरणे थेट पृथ्वीवर पडले तर मानवाबरोबरच झाडे,प्राणी आणि इतर जीव यांच्यावर याचा अत्यंत धोकादायक,परिणाम होऊ शकतो, हे किरणे मानवाबरोबरच प्राण्यांमध्येही विविध आजार उत्पन्न करू शकतात अशा परिस्थितीत ओझोन थराचे जतन करणे फार महत्वाचे असून पृथ्वीवरील आपल्या जीवनासाठी ओझोन महत्त्वपूर्ण आहे आणि आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी ओझोन थराचे संरक्षण करणे जबाबदारी नसून प्रत्येकाचे कर्तव्य आहे, म्हणून प्रत्येकाने जबाबदारी म्हणून कार्य करावे असे आवाहन राहुल मोरे यांनी जागतिक ओझोन दिनानिमित्ताने केले आहे.
ओझोनचे आवरण कमी करणार्या किंवा क्षीण करणाऱ्या पदार्थांचा कटाक्षाने वापर टाळणे किंवा नियंत्रित करणे आवश्यक आहे. तरच, ओझोन थर आपल्यासह भविष्यातील पिढ्यांसाठीचेही संरक्षण करू शकेल. जागतिक हवामान बदल आणि उष्णतावाढीच्या पार्श्वभूमीवर ओझोनचे आवरण वाचवण्यासाठी अधिकाधिक सक्रिय प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सूर्यापासून निघणार्या अतिनील किरणांना थोपवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करून जगाच्या रक्षणाचे कार्य ओझोनचा थर करतो.वातावरणातील मानवनिर्मित वायूमुळे ओझोन थराला छिद्र पडल्याचे निदर्शनात आले होते, ते पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्न करून त्याला यशही आले असले तरी,पूर्वपदावर येण्यासाठी २०५० पर्यंत आपल्याला त्याची वाट बघावी लागणार असून त्यासाठी ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी या पृथ्वीतलावरील प्रत्येक नागरिकांनी आपले कार्य कर्तव्य म्हणून करणे ही काळाची गरज असून याचे वेळीच गांभीर्य लक्षात घेऊन कृतिशील पावले उचलणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ओझोनचा थर आपल्यासह सर्व येणाऱ्या भविष्यातील पिढ्याचे संरक्षण करू शकेल,त्यासाठी सर्वांनी अधिकाधिक पृथ्वीचे सुरक्षाकवच वाचवण्यासाठी पुढे येऊन कार्य करण्याची गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
