‘जलजीवन’मध्ये मलिदा लाटणार्या अधिकार्यांवर कारवाई करणार-पालकमंत्री सावे

‘जलजीवन’मध्ये मलिदा लाटणार्या अधिकार्यांवर कारवाई करणार-पालकमंत्री सावे
बीड/प्रतिनिधी
केंद्र शासनाची महत्वपूर्ण योजना असलेल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून दिले गेलेले कंत्राटे ठरावीक लोकांना आणि अधिकार्यांच्या नातेवाईकांना दिली गेली असल्याचे समोर आल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी अशा मलिदा लाटणार्या अधिकार्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर गेले अनेक महिने पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नव्हत्या परंतू गेल्या महिन्यामध्ये पालकमंत्र्यांच्या निवडी करण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे औरंगाबादचे अतुल सावे यांच्याकडे गेले. गुरूवारी पहिल्यांदाच पालकमंत्री सावे हे बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी अंगणवाडी बांधकामासाठी डिपीडिसीच्या माध्यमातून द्यावयाचा दोन लाखांच्या निधी संदर्भात निर्णय घेतल्याचे सांगितले. त्याच बरोबर सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पीकांचे जे नुकसान झाले त्याचे पंचनामा करण्याच्या सुचना दिले असल्याचे ते म्हणाले. डिपीडीसीच्या निधीचे समान वाटप करण्यात येईल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले तर 15 ऑक्टोबरपासून कारखाने सुरू होतील असे सांगतानाच पालकमंत्री सावे यांनी जलजीवन मिशनच्या कामामध्ये ज्या अधिकार्यांनी जलजीवन मिशनची कंत्राटे आपल्या जवळच्या लोकांना दिली आणि मलिदा लाटला त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले. सावे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा बँकेच्या निवडणुका लवकर घेतल्या जातील असे देखील सांगितले. या पत्रकार परिषदेला बीडच्या खा.डॉ.प्रितम मुंडे, आ.अॅड.लक्ष्मण पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, सर्जेराव तांदळे आदींची उपस्थिती होती.
