त्यांनी सामाजिक जाणिवेतून संवर्धिले माणूसकीचे मूल्य!!

Beed

त्यांनी सामाजिक जाणिवेतून संवर्धिले माणूसकीचे मूल्य!!

बी.एम. प्रतिष्ठान : १२ नवजात मुलांना सोन्याची अंगठी देवून मातांचे केले औक्षण

शरदचंद्र पवार, स्व.गोपीनाथ मुंडेंसाठी राबविला उपक्रम : बाळासाहेब मस्के

गेवराई / प्रतिनिधी

गेवराई येथील शासकीय रुग्णालयात प्रसुती झालेल्या १२ मातांचे औक्षण करत त्यांना साडी व त्यांच्या नवजात मुलांना १ सोन्याची अंगठी, ड्रेस देऊन सन्मानित करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम बी.एम.प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस तसेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त राबविला असून या आदर्श उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

   बी.एम.प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के हे नेहमीच कोणते ना कोणते उपक्रम राबवित असतात. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार तसेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती १२ डिसेंबर रोजी असते. या निमित्ताने बी.एम.प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी एक आगळावेगळा आदर्श उपक्रम राबविण्याचा मानस केला. त्यानुसार गेवराई शासकीय रुग्णालयात या दोन्ही महान नेत्यांच्या जन्मदिनी प्रसुती झालेल्या १२ महिलांचे औक्षण मंगळवारी करण्यात आले. यानंतर त्यांना साडी, तसेच त्यांच्या नवजात मुलांना १ ग्रँमची अंगठी, ड्रेस देऊन गौरविण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजेश शिंदे, स्त्री रोगतज्ञ गोपाल रांदड, डॉ. रऊफ मोमीन, श्रीमती संगिता जोगदंड, विजया गायसमुद्रे, स्वाती बारगजे, भाग्यश्री बाबळे आदींसह बी.एम. प्रतिष्ठाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव उपस्थित होते.

कौतुकास्पद उपक्रम :डॉ. राजेश शिंदे

 रुग्णालयात प्रसुती झालेल्या महिला व त्यांच्या नवजात मुलांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. हा खरच कौतुकास्पद उपक्रम असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेश शिंदे यांनी यावेळी म्हटले.

सर्वसामान्य जनतेला सोन्याचे दिवस आणले

महाराष्ट्राच्या पावनभूमीत अशी काही माणसे होवून गेलीत आणि अजूनही आहेत ज्यांनी सर्वसामान्य जनतेला सोन्याचे दिवस आणले. त्यांनी राज्यासाठी दिलेले योगदान हे युवा पिढींना कायम प्रेरणादायी असेल. अशा काही सोनेरी माणसांपैकीच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमीत्त तसेच जाणता राजा शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त गेवराई शासकीय रूग्णालयात नवजात जन्म घेतलेल्या सोन्यासारख्या बालकांना एक मामा या नात्याने सोनेरी भेट व बहिणी मातांना साडीची भेट दिली. दरम्यान या नवजात बालकांनी भविष्यात शरदचंद्र पवार, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा नावलौकिक करावा या शुभेच्छा.

Sharing

Visitor Counter