प्रकल्पग्रस्तांचे आता काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन

प्रकल्पग्रस्तांचे आता काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन
महानिर्मिती आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी अनोखे आंदोलन, आमचा अंत पाहू नका - प्रकल्पग्रस्त
परळी वैजनाथ/वार्ताहर
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी उपोषण सुरू करून प्रकल्पग्रस्तांना आज सहा दिवस झाले असले तरी अद्याप जमिनी संपादन करणाऱ्या महानिर्मिती कंपनी आणि प्रशासनाला जाग न आल्याने संतप्त उपोणार्थींनी आज डोळ्याला काळ्या पट्ट्या बांधून उपोषण केले. दरम्यान उपोषणाला बसुन सहा दिवस झाले तरी महानिर्मिती कंपनी आणि प्रशासनाने झोपेचे सोंग घेत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आंदोलनाने वेगळे स्वरूप घेतले तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष सुधीर फड यांनी दिला आहे.
गेल्या शनिवारपासून प्रकल्पग्रस्त आपल्या न्याय्य मागण्यांसाठी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. प्रकल्पग्रस्तांना कायम सेवेत सामावून घ्यावे, 45 वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तांचा निर्वाह भत्ता 30 हजार रुपये करावा, चंद्रपूर पाॅवर स्टेशन येथे प्रकल्पग्रस्तांचे दाखल करण्यात आलेल गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत आदी मागण्यांसाठी गेल्या शनिवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
काळ्या पट्ट्या बांधून केले आंदोलन
सहा दिवसापासून प्रकल्पग्रस्त उपोणाला बसले आहेत मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी घेणारी वीज निर्मिती कंपनी आणि प्रशासन कोणतीही सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांमध्येही असंतोष व्यक्त केला जात आहे. यामुळे निषेध करण्यासाठी डोळ्याला काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केले. डोळ्याला काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केल्याने रस्त्याने जाणारे लोक आश्चर्याने बघत होते.
प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आमरण उपोषण असुन यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त आणि त्यांचे कुटुंबीयांचा पाठिंबा आहे. महानिर्मिती कंपनी आणि प्रशासन जाणिवपुर्वक दुर्लक्ष प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करणार असून झालेल्या परिणामाची जबाबदारी प्रशासनावर राहिल असा इशारा महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष सुधीर फड यांनी दिला आहे.
