अशोक मसलेकर यांची कविता बुद्धाच्या करूणेशी नातं सांगणारी

अशोक मसलेकर यांची कविता बुद्धाच्या करूणेशी नातं सांगणारी
प्रा.डॉ.मनोहर सिरसाट यांचे प्रतिपादन
बीड/प्रतिनिधी
अशोक मसलेकर यांच्या सामाजिक, राजकीय, विद्रोही अर्थात "सारावि" या काव्यसंग्रहाचा एकूण प्रपंच हा तथागतांच्या विचाराशी नातं जोडणारा आहे. स्वातंत्र्य',समता' व बंधुता या मूलभूत तत्वाशी या कविता जोडल्या गेल्या आहेत. सामाजिक', राजकीय आणि धार्मिक गोष्टीवर चालत आलेल्या अवडंबरी थोतांडावर त्यांनी प्रकर्षाने प्रहार केलेला आहे.
अभिसंधान प्रकाशनाकडून प्रकाशित कवी अशोक मसलेकर यांच्या सारावि या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात भाष्य करतांना बलभीम महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रो.डॉ. मनोहर सिरसाट बोलत होते.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी तुलसी शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे हे होते.
यावेळी पुढे बोलतांना प्रो.मनोहर सिरसाट म्हणाले की' या काव्यसंग्रहातील कविता विचार देणाऱ्या असून कमी शब्दात खूप काही अर्थबोध देऊन जातात. सामाजिक' राजकीय' धार्मिक या विकृतीवर प्रहार करतात. व बाबासाहेबांचा शिका,संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्रही अनेक कवितांमधून प्रतिबिंबित होतो. कवी अशोक मसलेकर यांनी आपल्या कवितांमधून सर्वसामान्य लोकांना समजतील अशी रचना केलेली आहे. काव्यातील बोजडपणा प्रकर्षाने टाळलेला आहे.सामाजिक परिवर्तनाची आस या कवितांमधून प्रकट होते.लोक झुंडीनं आपापली जात धर्म घेऊन मत पेट्या भरत आहेत,आणि प्रजासत्ताक लोकशाहीचं कंबरडं मोडत आहेत. देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटली तरी आपल्या देशाला सज्जन राष्ट्रहित जपणारा 'आय ॲम इंडियन फर्स्ट अँड इंडियन लास्ट' म्हणू शकणारा बाबासाहेबांसारखा बुद्धिमान चारित्र्यसंपन्न,समदृष्टीवान, संयमी,विवेकी,कारुण्याने अंतकरण भरलेला मनुष्य निर्माण करण्यात आपणास अपयश आल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बीड जिल्ह्याचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा लातूर विभागाचे विभागीय शिक्षण सचिव कविवर्य शशिकांत हिंगोणेकर हे प्रमुख अतिथी म्हणून या समारंभात उपस्थित होते. ते यावेळी म्हणाले की, शिक्षित,तंत्रविकसित मनुष्य चिडून बंदूक पिस्तूल क्षेपणास्त्रांचा वापर करू लागतो. परंतु विवेकी मनुष्य या निगरगठ्ठ व्यवस्थेला शब्दांचेच सुरुंग लावतो. जसे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू' असा तुकोबांचा वारसा चालवणारे सज्जन शब्दांनाच धार लावून आक्रमण करतात.जग बुडत चाललय ते वाचवायचं तर विवेकपूर्ण व्यवहारच उत्तम आहे.त्या विवेकी व्यवहारात कवी अशोक मसलेकर हे प्रकर्षाने काम करतांना दिसतात.साहित्यिक, विचारवंत समाजाला दिशा देतात,त्याप्रमाणे सारावि मधील कविता ह्या समाजाला दिशा देणाऱ्या आहेत,अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अभिसंधान प्रकाशनाचे प्रकाशक प्राचार्य श्रावण गिरी यांनी यावेळी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करतांना प्रा.प्रदीप रोडे म्हणाले की,कवी मसलेकर यांची कविता प्रबोधनाची आहे.विचारप्रधानता हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे.
या प्रकाशन समारंभाप्रसंगी उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे,शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम पवार, नगरसेवक विनोद मुळूक, सरस्वती विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव पवार,कवी प्रा.डॉ.संजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रेक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय जाधव यांनी तर प्रा.श्याम माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
वाचकांसाठी सारावि काव्यसंग्रहाची पुस्तके डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समोर एम.एम.शेख यांच्या पीस बुक डेपो येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
