संपादक शिवाजीराव रांजवण यांनी उतरवला माजलगाव, धारूर तालुक्यातील पत्रकांराचा अपघाती विमा

संपादक शिवाजीराव रांजवण यांनी उतरवला माजलगाव, धारूर तालुक्यातील पत्रकांराचा अपघाती विमा
- पत्रकारांना मिळणार दहा लक्ष रूपयांचे अपघाती विमा कवच
- व्हॉईस ऑफ मीडियाच्या संकल्पनेला रांजवण यांच्याकडून मूर्त स्वरूप
प्रतिनिधी/माजलगाव
दि.12 : पत्रकार नेहमीच स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असतात. समाजाचे प्रश्न मांडत असताना दुर्दैवाने त्यांच्यावर काही विपरीत प्रसंग ओढवला तर त्यांच्या पश्चात कुटुंबाचे फार हाल होतात. अपघातातील दवाखान्याचा खर्च भागवणे देखील मुश्किल होऊन जाते. पत्रकार किंवा त्यांच्या कुटुंबियांना अशा कुठल्याही आर्थिक प्रसंगाला तोंड द्यावे लागू नये, म्हणून दैनिक कार्यारंभचे संपादक शिवाजीराव रांजवण यांनी सामाजिक जाणीवेतून माजलगाव आणि धारूर तालुक्यात विविध दैनिकांसाठी काम करणार्या सर्व पत्रकारांचा अपघाती विमा उतरवला आहे. व्हॉईस ऑफ मीडियाने रांजवण यांच्यासमोर पत्रकारांच्या विम्याचा प्रस्ताव ठेवताच त्यांनी त्याला मूर्त स्वरूप दिले.
राष्ट्रमाता मॉ जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंती व दर्पण दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम गुरूवार दि.12 रोजी राबविण्यात आला. माजलगाव शहरातील मोरेश्वर विद्यालयांमध्ये आयोजित कार्यक्रमास तहसीलदार वर्षा मनाळे, सब पोस्ट मास्तर दत्तात्रय भावसार, ज्येष्ठ पत्रकार उमेश मोगरेकर, अजित रांजवण यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संपादक शिवाजीराव रांजवण म्हणाले, कष्टकरी शोषित पीडित समाजाचा आवाज बनलेल्या पत्रकार बांधवांना 24 तास फिल्डवर काम करावे लागते. कधी कोणती अप्रिय घटना होऊ शकते हे कोणी सांगू शकत नाही. यामुळे मी माजलगाव, धारूर तालुक्यातील जेवढे पत्रकार आहेत त्यांचा माझ्यावतीने दहा लक्ष रुपयाचा अपघात विमा काढण्याचे ठरवले आहे. हा उपक्रम पत्रकरांप्रती असलेल्या सामाजिक भावनेतून करत आहोत. यात कोणतेही राजकारण किंवा स्वार्थ नाही. ही संकल्पना व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिल्यामुळे मी हा उपक्रम राबवत असल्याचे रांजवण यांनी सांगितले.
तहसीलदार वर्षा मनाळे म्हणाल्या, पत्रकार हे देशाचा चौथा स्तंभ असून माजलगाव येथील पत्रकार सामाजिक कार्यात खूप अग्रेसर आहेत. माजलगावच्या पत्रकार बांधवांनी माजलगावच्या धरणात बुडालेल्या जवानास 54 लाखाचा मदतीचा हात दिला होता. मात्र याच पत्रकार बांधवांना कुठलेच संरक्षण नसून संपादक शिवाजीभाऊ रांजवण यांच्या या स्तुत्य उपक्रमास आपल्या शुभेच्छा आहेत. एखाद्या संपादकाने इतर दैनिकातील पत्रकारांचा देखील विमा काढावा हे कौतूकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.
अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ पत्रकार उमेश मोगरेकर म्हणाले की आज पर्यंत एकाही संपादकाने त्यांच्या दैनिकांमध्ये काम करणार्या वार्ताहरासाठी कसलाच प्रकारचा विमा उतरवला नाही. हा पहिलाच प्रयोग आहे, जो दैनिक कार्यारंभचे संपादक शिवाजीभाऊ रांजवण यांनी राबवला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून दबलेल्या कष्टकरी, शोषित, पीडित पत्रकारांना त्यांच्या संकल्पनेतून अपघाती दहा लक्ष रुपयाचे विमा कवच देणारे रांजवण एकमेव संपादक असल्याचे मोगरेकर म्हणाले. अपघात विमा काढण्यासाठी माजलगाव पोस्टातील सब पोस्ट मास्तर दत्तात्रय भावसार, सुहास राक्षसभुवणकर, पोस्टमास्तर गिरी, संदिप काटुळे, दिपशिखा वर्मा यांनी काम पाहीले.
कार्यक्रमास माजलगावच्या तालुका, ग्रामीण पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कार्यारंभचे धारूर तालुका प्रतिनिधी तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष सचिन थोरात यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दैनिक कार्यारंभचे तालुका प्रतिनिधी तथा व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष वैजनाथ घायतिडक यांनी परिश्रम घेतले.