मिल्लिया बॉईज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचा विद्यार्थी बनला न्यायाधीश

मिल्लिया बॉईज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचा विद्यार्थी बनला न्यायाधीश
शाळेतर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भव्य स्वागत सत्कार
बीड/प्रतिनिधी
तालुक्यातील माळापुरी येथील रहिवासी व मिल्लिया माध्यमिक शाळा (मुलांची) या शाळेचा माजी विद्यार्थी हाशम बेग मोहम्मद बेग याने नुकतेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्य पातळीवरील परीक्षेत राज्यात दहावा क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळविले. या निमित्ताने हाशम बेग सह त्याचे वडील मोहम्मद बेग यांचेही मिल्लिया माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत भव्य कार्यक्रम घेऊन स्वागत सत्कार करण्यात आले.
हाशम बेग यांनी विद्यार्थी दशेत इयत्ता आठवी मध्ये मिल्लिया माध्यमिक शाळा (मुलांची) येथे प्रवेश घेतला होता. आठवी ते दहावी पर्यंत येथे शिक्षण घेऊन अकरावी व बारावी चे शिक्षण ही मिल्लिया उच्च माध्यमिक शाळेत पूर्ण केले. यानंतर त्यांनी बीड येथीलच लॉ कॉलेजमध्ये एलएलबी चे शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व त्यात त्यांनी राज्यात दहावा क्रमांक मिळविला. आणि त्यांची न्यायाधीश पदी निवड झाली.
या निमित्ताने मिल्लिया माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत करण्यात आलेल्या स्वागत सत्कार समारंभात बोलताना हाशम बेग यांनी म्हटले की, विद्यार्थ्याला शिक्षणात रस असेल, चांगले शिक्षण घेण्याची इच्छाशक्ती असेल व त्यासाठी भरपूर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर यश हे हमखास मिळतेच मिळते. मी बीड तालुक्यातील माळापुरी या एका छोट्या खेड्यातील एक सर्व सामान्य साधारण शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतला. माझ्या वडिलांच्या अगोदर कुटुंबात कोणीही उच्च शिक्षण घेतलेले नाही. परंतु आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे, चांगले शिकून काहीतरी चांगले बनावे, म्हणून माझ्यासाठी, माझ्या शिक्षणासाठी बारकाईने नजर देऊन माझ्याकडूनही सातत्याने चांगला अभ्यास करून घेतला. मला शिक्षणाची गोडी लावली आणि मी पुढे शिकत गेलो. परंतु बीड शहरात राहून मिल्लिया शाळेत शिकत असताना जेव्हा-जेव्हा गावी माळापुरी मध्ये जाणे व्हायचे तेव्हा-तेव्हा मी फक्त घरी बसून राहत नव्हतो तर वडिलांसोबत शेतीत जाऊन त्यांच्या बरोबरीने काम करीत होतो म्हणून शिक्षण घेताना फक्त शिक्षणच घेत राहावे बाकी बाबींकडे लक्ष देऊ नये असे नाही. आपल्या घरी आपले वडील किंवा इतर जण जे काही उद्योग व्यवसाय करतात त्यातही शिक्षण घेता-घेता जसा वेळ मिळेल तसे आपणही आपले हातभार लावावे. हे करतानाच शिक्षण ही तेवढ्याच आत्मीयतेने घ्यावे. मग बघा यश तुमच्याकडे कसे धावत येते असे म्हणून माझ्या वेळेस असलेले सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य या सर्वांनीही माझ्यातील शैक्षणिक गुणवत्तेला चांगले मार्गदर्शन करून मला एक चांगला विद्यार्थी म्हणून घडविले आणि आज या सर्वांचा परिपाक आज आपल्या सर्वांसमोर विशेष म्हणजे ज्या शाळेत मी शिक्षण घेतले त्याच शाळेत आपल्या सर्वांसमोर एक न्यायाधीशपदी विराजमान झालेला व्यक्ती म्हणून उभा आहे. आपल्याला संबोधित करत आहे. यापेक्षा गौरवाची बाब कोणती असू शकते असे गदगद मनोगत व्यक्त केले.
या स्वागत सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य सय्यद अब्दुल सत्तार, प्रमुख अतिथी संपादक मोहम्मद अबूबकर चाऊस, प्रमुख पाहुणे म्हणून अलीम टेलर, मोहम्मद बेग होते. अंजुमन इशाअत ए तालीम संस्था बीड चे अध्यक्ष डॉ. सलीम अहेमद चाऊस, सचिव खान सबीहा बेगम, डॉ. समीर अहेमद, उपप्राचार्य डॉ. फैसल चाऊस यांनी हृदयी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जावेद पाशा यांनी केले तर रियाज खान यांनी आभार व्यक्त केले.
