जनसेवा हाच ध्यास प्रतिष्ठान सुंबेवाडीची गुरु पोर्णिमेनिमित्त अनोखी गुरुदक्षिणा

Ashti

जनसेवा हाच ध्यास प्रतिष्ठान सुंबेवाडीची गुरु पोर्णिमेनिमित्त अनोखी गुरुदक्षिणा

आष्टी/तुकाराम गणगे
तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील सुंबेवाडी येथील नेहमीच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मदत करण्यात अग्रेसर असणारे जनसेवा हाच ध्यास प्रतिष्ठानने गुरु पोर्णिमेनिमित्त अनोखी गुरुदक्षिणा दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असा की, "सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का?शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?" या बालगीताची आठवण यावी अशी अवस्था सुंबेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची झाली होती. जीव मुठीत घेऊन लहानग्यांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत वर्गात जावे लागायचे. पाऊस पडल्यावर शाळेच्या आवारात पाणी साचल्याने मुलांना कोणतेही मैदानी खेळ खेळता यायचे नाहीत. सरकारी काम अन सहा महिने थांब या उक्तीप्रमाणे सरकारी मदत जाहिर होण्याची वाट न पाहता, मैदानाची पावसाळ्यात होणारी दुरावस्था पाहुन जनसेवा हाच ध्यास प्रतिष्ठान यांच्या वतीने बारा टॅक्टर मुरुम टाकण्यात आला. मुरुम टाकल्यामुळे शाळेच्या आवारात पाणी साचणार नाही. या स्तुत्य उपक्रमाची दखल घेत शाळेचे शिक्षक व गावकऱ्यांनी प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले.

अनादी काळापासून गुरु शिष्य परंपरा कायम आहे. ज्या शाळेत शिकून मोठे झालो त्याबद्दल प्रत्येकाला ममत्व असते. आपणही समाजाचे/शाळेचे देणं असतोत या भावनेतून आम्ही शाळेला मदत करुन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आगळीवेगळी गुरुदक्षिणा दिली. प्रत्येक काम हे सरकारने केले पाहिजे या विचारातून आपण बाहेर पडलो पाहिजेत,असे मत जनसेवा हाच ध्यास प्रतिष्ठान सुंबेवाडी यांनी व्यक्त केल्या.

Sharing

Visitor Counter