शेतकऱ्यांची युरिया खताबाबत अडवणूक करू नका,सहकार्य करा- बद्रीनाथ जगताप

शेतकऱ्यांची युरिया खताबाबत अडवणूक करू नका,सहकार्य करा- बद्रीनाथ जगताप
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे उगवलेल्या पिकांना रासायनिक खतांची मात्रा देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. परंतु, तालुक्यात खतटंचाई जाणवत आहे. यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाल्याने काही भागात वेळेवर पेरण्या झाल्या. ही पिके उगवली आहेत. पण खत दुकानदार युरिया खत जादा दराने विक्री करीत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सर्व दुकानांत शोध घ्यावा लागत आहे.तसेच युरीया मिळालाच तर काही व्यापारी शेतकऱ्यांना युरीया सोबत इतर खते,औषधे घेण्यासाठी बंधनकारक सक्ती करून बळजबरी इतर वस्तू लादत आहेत.या अश्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर आष्टी तालुक्यातील कृषी केंद्र व्यापारी असोसिएशनची बैठक घेतली यावेळी शेतकऱ्यांची युरिया खताबाबत अडवणूक करू नका,शेतकऱ्यांना सहकार्य करा अशा सूचना यावेळी आष्टी पंचायत समिती सभागृहात बैठक घेऊन सभापती बद्रीनाथ जगताप यांनी केल्या.
यावेळी बैठकीस गटविकासअधिकारी प्रभाकर अनंत्रे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, पंचायतसमिती कृषी अधिकारी उद्धव नेटके, मंडळ कृषी अधिकारी गोरख तरटे, विस्तार अधिकारी धनंजय निंबाळकर,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संपत शेळके हे उपस्थित होते.
तसेच युरिया वितरणामध्ये सुसुत्रता आणून शासकीय दरापेक्षा जास्त दराने युरिया खताची विक्री करू नये, युरिया खत विक्री करताना विक्रीची पक्की पावती शेतकऱ्यांना दयावी. युरियाबरोबर इतर कोणत्याही निविष्ठाची सक्ती शेतकऱ्यांना करू नये.असे आढळल्यास तालुक्यात दुकानदारांची तपासणी सुरू असून जादा दराने खत विक्री करणारे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी दिला.
यावेळी कृषी केंद्र व्यापारी असोसिएशन पदाधिकारी यांनी देखील शेतकऱ्यांना सहकार्य करू अशा भावना बैठकीत व्यक्त केल्या.
