जलयुक्तच्या कारभारावर कॅगने ओढले ताशेरे

जलयुक्त शिवार अभियानात वाया घालवलेल्या १० हजार कोटींना जबाबदार कोण? बोगस कारभार अखेर कॅगने उघडा केला - धनंजय मुंडे
जलयुक्तच्या कारभारावर कॅगने ओढले ताशेरे
मुंबई/वृत्तपत्र
केवळ पक्षातील ठेकेदारांना पोसण्याच्या उद्देशाने भाजप सरकारने गवगवा केलेल्या अशास्त्रीय जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारावर आज कॅगच्या अहवालातून ताशेरे ओढण्यात आले आहेत. याबाबत आम्ही वेळोवेळी विरोध नोंदवून यातील भ्रष्टाचार उघड केला होता, या अभियानात सुमारे १० हजार कोटी रुपये वाया घालवले याला जबाबदार कोण? असा सवाल राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार ही योजना अपयशी ठरल्याचे 'कॅग'कडून नमूद करण्यात आले आहे. या योजनेवर ९६३४ कोटी रुपये खर्च करूनही पाण्याची गरज भागवण्यात व भूजल पातळी वाढवण्यात अपयश आल्याचे कॅगने म्हटले आहे. 'कॅग'चे हे ताशेरे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. जलयुक्त शिवार ही देवेंद्र फडणवीस व तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची महत्त्वाकांक्षी योजना होती. तत्कालीन सरकारकडून या योजनेचा मोठा गाजावाजाही करण्यात आला. मात्र, आता कॅगने या योजनेमुळे मूळ उद्दिष्टांची पूर्ती झालीच नसल्याचे तसेच या योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याचे म्हटले आहे.
बीड, बुलढाणा, सोलापूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ८०%हून अधिक बोगस कामे झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या, तसेच काही बाबतीत गुन्हेही दाखल झाले होते.
या योजनेतील भ्रष्ट व ठेकेदार धार्जिन्या कारभाराबाबत विरोधी पक्षात असताना सातत्याने आपण आवाज उठवला होता. वेळोवेळी सभागृहात व सभागृहाबाहेर पुराव्यांसाहित या भ्रष्टाचाराबाबत आपण तक्रारी केल्या होत्या, मात्र तत्कालीन सरकारने यावर जाणीवपूर्वक डोळेझाक केली. मात्र कॅग च्या अहवालातून आता या योजनेचा व त्यातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केलेला आहे, हेच १० हजार कोटी शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचनाच्या सोयी व अन्य कामांसाठी वापरता आले असते. उघड झालेल्या या भ्रष्टाचाराची आता सखोल चौकशी करून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशावर आपल्या तुंबड्या भरलेल्यावर कारवाई केली जावी अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.
