विकासाचे महामेरू - स्व. सुंदरराव सोळंके साहेब

विकासाचे महामेरू - स्व. सुंदरराव सोळंके साहेब
धारूर/वार्ताहर
बालाघाट पर्वताच्या पायथ्याशी मोहखेड नावाचे छोटेसे टुमदार गाव. कानिफनाथ हे गावाचे आराध्य ग्रामदैवत. येथील पुण्यवंत दाम्पत्य स्व.इंदिराबाई व स्व.आबासाहेब सोळंके यांच्या पोटी दि.१७ सप्टेंबर १९२७ रोजी सुंदर पुत्ररत्नाचा जन्म झाला होता.मुलगा अतिशय देखणा, रुपवान, दिसायला सुंदर असल्यामुळे आई -वडीलांनी मोठ्या आवडीने त्यांचे नाव सुंदर ठेवले होते.
परंतु त्यांचे उमलणारे सौंदर्य पाहण्यापूर्वीच नियतीने आई वडीलांचे छञ हिरावून नेले. दाजीसाहेब, शंकरराव, वैजीनाथराव व सुंदरराव हे चार बंधू आणि गवळण व मंडोदरी या दोन बहिणी.
शिक्षण
आदरणीय सुंदरराव सोळंके साहेबांचे प्राथमिक शिक्षण मोहखेड येथे झाले. पुढील शिक्षणासाठी मोहखेड येथील कै. बाजीराव गुरुजी यांनी अंबाजोगाईला आणले. १९४८ साली उमरगा येथे मॅट्रीक परिक्षा दिली. पुढील शिक्षणाची सोय मराठवाडयात नसल्याने हैद्राबाद येथील उस्मानीया विद्यापीठात प्रवेश घेतला.१९५२ साली एल.एल.बी. ची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली होती.
वैवाहिक जीवन
अंबाजोगाई तालुक्यातील हातोला गावचे सधन शेतकरी स्व. दौलतराव चव्हाण यांच्या सुकन्या रत्नमालाबाई यांच्या सोबत १९५२ साली स्व.सुंदरराव सोळंके साहेब विवाहबद्ध झाले होते. त्यांनी केज व बीड येथील न्यायालयात वकिली व्यावसाय केला. त्यांच्या दैदिप्यपान कारकिर्दीत त्यांच्या पत्नी स्व.रत्नमालाबाई यांचा सिंहाचा वाटा होता. स्व.रत्नमाला व स्व. सुंदरराव साहेबांना प्रकाश, चंद्रकांत,धैर्यशील व संजय अशी चार पुत्ररत्ने झाली.आपणास एखादी मुलगी असायला पाहिजे असे त्यांना मनोमन वाटे.
सक्रीय राजकारणात प्रवेश
जनसंपर्क वाढलेल्या स्व. सुंदरराव सोळंके साहेबांची १९५८ साली बीड जिल्हा लोकल बोर्डावर निवड झाली होती. १९६२ ते १९६७ पर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहीले. १९६७ साली केज विधानसभा मतदारसंघातू निवडून येथून विधानभवनात प्रवेश केला होता. स्व.वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात स्व.सुंदरराव सोळंके साहेब शिक्षण व उद्योग खात्याचे उपमंत्री झाले होते. १९७० ला महसुल व सहकार खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आली.
१९७२ ला केज मतदार संघ राखीव राहील्याने गेवराई तालुक्यातील दैठण येथील स्व. सयाजीराव पंडीत व शिवाजीराव पंडीत यांनी स्व.सुंदरराव सोळंके यांनी गेवराईतून निवडणूक लढवावी अशी गळ घातली. अर्ज भरल्यानंतर स्व.सुंदरराव सोळंके साहेब आपल्या सहकाऱ्यांसोबत श्री क्षेत्र भगवानगडावर गेले.तेथे त्यांनी राष्ट्रीय संत श्री भगवान बाबा यांच्या समाधीचे व महंत भिमसिंग महाराजांचे दर्शन घेतले. महाराजांनी "सुंदरराव तुम्ही बिनविरोध निवडून येणार आहात" असा आशिर्वाद दिला. तो खरा ठरला. स्व.सुंदरराव सोळंके साहेब बिनविरोध निवडून आले होते. त्यांची वीज निर्मिती, ग्राम विकास व क्रिडा खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली.पुन्हा १९७७ ला स्व. वसंतराव नाईक यांच्या मंत्री मंडळात त्यांना मानाचे स्थान देण्यात आले. १९७८ साली माजलगाव विधानसभा मतदार संघातून विजयी झाले. या वेळी स्व.वसंतदादा पाटील याच्या मंत्रिमंडळात स्व.सुंदरराव सोळंके साहेब महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री झाले होते.
पुरोगामी लोकशाही दल
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत स्व.सुंदरराव सोळंके साहेब स्व.वसंतदादा पाटलांच्या मंत्रीमंडळातून बाहेर पडले.१९७८ साली मा.शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री व स्व.सुंदरराव सोळंके उपमुख्यमंत्री झाले. पुढे १९८० साली स्व.सुंदरराव सोळंके साहेबांनी जवळच्या मित्रांसह इंदिरा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. १९८० च्या अटीतटीच्या निवडणूकीत स्व.सुंदरराव सोळंके साहेबांचा १८०० मतांनी निसटता पराभव झाला होता.
विकास गंगा
अंबाजोगाई येथील सहकारी साखर कारखाना, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई, माजलगाव सहकारी साखर कारखाना, औरंगाबाद, बीड, माजलगाव, उदगीर येथे दूध शितकरण केंद्र, औरंगाबाद येथे देवगीरी टेक्सटाईल, औरंगाबाद, बीड, लातूर, परळी येथे औद्योगीक वसाहती, बीड येथे चर्मोद्योग प्रकल्प, परळी येथील औष्णीक विद्युत केंद्र, मुंबई ते विजयवाडा हा राष्ट्रीय महामार्ग बीड -तेलगाव मार्गे करण्यात यश, माजलगाव जलसिंचन प्रकल्प, मोहखेड सरस्वती जलसिंचन प्रकल्प, वाण प्रकल्प नागापूर, मांजरा प्रकल्प धनेगाव, कुंडलीका प्रकल्प उपळी, मनकर्णिका प्रकल्प सुर्डी, गुणवती प्रकल्प सिरसाळा, माजलगाव बझार यासाठी मोलाचे योगदान दिलेले होते.
१ सप्टेंबर १९५८ रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. १९६९ साली स्व.सुंदरराव सोळंके साहेब यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यांनी सिंदफणा पब्लीक स्कूल माजलगावची स्थापना केली होती.विकासाचा ध्यास असलेल्या सृजनात्मक नेतृत्वाची, लोकनेत्याची प्राणज्योत दि.५ नोहेंबर २०१४ रोजी मावळली.
स्व.सुंदरराव सोळंके साहेबांच्या चार पुत्ररत्नांपैकी चौथे स्व.संजयराव यांचे अपघाती निधन झाले. दुसरे चिरंजीव चंद्रकांत हे पुणे येथे व्यावसायात अग्रणी आहेत. स्व.सुंदरराव सोळंके साहेब यांच्या सामाजिक व राजकीय अपूर्ण स्वप्नांची पुर्तता करण्याचे कार्य आ.प्रकाशदादा सोळंके, मा.धैर्यशील काका सोळंके व मा.जयसिंग भैया सोळंके करीत आहेत.
आज दि. १७ सप्टेंबर स्व.सुंदरराव सोळंके साहेबांची जयंती... त्या निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
