घासातला घास कुत्र्याच्या पिल्लाला भरवणारा पोलिसातला देव माणुस.!

Beed

घासातला घास कुत्र्याच्या पिल्लाला भरवणारा पोलिसातला देव माणुस!

स्वतः उपाशी राहून भागविली कुत्र्याच्या पिल्लाची भूक !

केज/वार्ताहार 

संत एकनाथ महाराज यांनी वाळूत पाण्यावाचून तडफडणाऱ्या गाढवाला पाजले. तसेच नामदेवांनी महाराजांनी पोळी घेऊन पळणाऱ्या कुत्राच्या पाठीमागे जाऊन त्याला तुपपोळी खाऊ घातली. अशा भूतदया दाखविणाऱ्या संतांच्या कथा आपण ऐकल्या आहेत. असाच एक प्रसंग केज येथे पहायला मिळाला

जणसामान्यात पोलिसांच्या विषयी अशी भावना असते की, पोलीस आणि त्यांचे अधिकाती अत्यंत कठोर असतात. पोलिसांना बघताच गुन्हेगारांना धडकी भरते. तसेच सामान्य माणूस पोलिसांच्या पासून चार हात दूर राहणे पसंत करतात किंवा कुठल्याही घटनेत पोलिसांच्या लचांड मागे नको म्हणून शक्यतो लांब राहतात; पण पोलीस देखील एक माणूस असतो आणि त्यांच्यातही माया, प्रेम भूतदया असते.

दि. १८ जानेवारी रोजी केज येथे नगर पंचायतीच्या चार प्रभागातील मतदानासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्ताला उभे होते. अशाच एका मतदान केंद्रावर सलग दोन दिवसां पासून बंदोबस्तावर असलेले धारूर पोलीस ठाण्यात नियमित कार्यरत असलेले पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव हे कर्तव्यावर असताना त्यांना आलेला उभ्यानेच नाष्ठा करीत कर्तव्य बजावत होते. हातात कागदी डिशमध्ये वडा पाव खाऊन भूक भागवत असताना त्या ठिकाणी एक दोन ते अडीच महिन्याचे कुत्र्याचे पिल्लू त्यांच्याकडे आशाळभूत नजरेने पहात होते. कधी एखादा घास कधी मिळतो का हुसकावून लावतात? असे त्याला वाटत असावे. त्या पिल्लाला पाहताच पोलीस उपनिरीक्षक भालेराव यांच्यातला माणूस जागा झाला. त्यांनी आपल्या स्वतःच्या भुकेची पर्वा न करता त्यांच्या डिशमधील सर्व अन्न त्या पिल्लाच्या पुढे ठेवले. ते खाल्ल्या नंतर ते पिल्लू तेथे उपस्थित असलेल्या इतरांकडे न जाता भालेराव साहेबांच्याकडे बघून शेपटी हलवीत होते. नंतर मग भालेराव साहेबांनी त्यांच्याकडच्या पाण्याची बाटलीतील पाणी डिशमध्ये ओतून त्या पिल्लाला पाजले. नंतर जेव्हा ते बंदोबस्तासाठी उभे राहिले तेव्हाही ते पिल्लू त्यांच्या जवळच घुटमळत होते.

मतदानाचे सर्व अपडेट घेण्यासाठी गेलेले दैनिक दिव्य-मराठीचे पत्रकार संतोष गालफाडे व दै. पुढारी आणि विविध पोर्टलसाठी वार्तांकन करणारे पत्रकार गौतम बचुटे यांनी हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. फोटो काढीत असताना पोलीस उपनिरीक्षक भालेराव यांनी पत्रकारांना फोटो काढू नका आणि याची कुठे प्रसिद्धी नको म्हणून नम्र विनंती देखील केली.

हा प्रसंग जरी छोटा असली तरी यातून पोलीसातली माणुसकी, त्यांच्यातील मुक्या प्राण्यावर प्रेम करण्याची भावना आणि संकटकाळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संकटग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची वृत्ती अधोरेखित होते.स्वतः उपाशी राहून कुत्र्याच्या पिल्लाची भूक भागविणाऱ्यापोलीस उपनिरीक्षक भालेराव साहेबांना सलाम.....!

Sharing

Visitor Counter