अजून किती बळी घेणार? — आ. विनायकराव मेटे

अजून किती बळी घेणार? — आ. विनायकराव मेटे
वाळू माफियांचा जिल्हा प्रशासनाने बंदोबस्त न केल्यास अधिवेशनात आवाज उठवणार —आ. मेटे
बीड/प्रतिनिधी
वाळू माफियांनी वाळू उपशासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचुन त्यात चार मुलांचा बुडून जीव गेला आहे. गेवराई तालुक्यातील मादळमोही जि. प. गटातील शहजानपूर चकला येथील नऊ ते बारा वयोगटांतील बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर या निष्पाप जीवांनाआपला जीव गमवावा लागला आहे.याबाबतीत शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आ. विनायकराव मेटे यांनी या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत शासनाविरोधात संताप व्यक्त केला. यासह अजून किती बळी घेणार असा सवाल सुद्धा आ. विनायकराव मेटे यांनी प्रशासनास विचारला आहे.
सिंदफणा नदीत गेल्या अनेक वर्षांपासून सर्रास वाळू उपसा सुरू आहे. एक दोन नव्हे तब्बल दहा ते वीस फुटांपर्यंत खड्डे वाळू माफियांकडून नदी पात्रात करण्यात आले आहे. हा वाळू उपसा बंद करावा यासाठी शिवसंग्रामच्या माध्यमातून अनेक वेळा आंदोलने करण्यात आलेली आहेत.अनेक वर्षापासून चालू असलेल्या अवैध वाळू उपशाबाबत व वाळू माफिया विरोधात बीड, जालना, औरंगाबाद जिल्हयात विवीध अंदोलने करण्यात आली आहे. तसेच विधान परिषदेतही याबाबत आवाज उठवलेला आहे.शासन दरबारी याचा पाठपुरावा करून पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे तरीदेखील हे प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.या दुर्लक्षाचा परिणाम म्हणजेच काल झालेला दुर्दैवी प्रकार आहे.असे आ.मेटे यांनी नमुद केले आहे.
यापूर्वीही अनेकांचे असेच निष्पाप बळी गेलेले आहेत.याबाबतीत वाळूमाफिया, संबंधित यंत्रणेतील लाचखाऊ अधिकारी व काही भ्रष्ट राजकारणी यांची युती असून स्वार्थापोटी यांना काहीच कशाची तमा नाही.या सर्व गोष्टीचा शेवट होणे गरजेचे आहे शासनाने यावर कडक भूमिका घेणे अनिवार्य आहे.येत्या काही दिवसात प्रशासनाने वाळू माफिया विरोधात कुठलीच ठोस कारवाई न केल्यास आगामी अधिवेशनामध्ये प्रस्ताव आणून सरकारला ठोस भूमिका घेण्यास भाग पाडू असा इशारा आ. मेटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हंटले आहे.
