आजपासून खडकीघाट येथे महायज्ञ

आजपासून खडकीघाट येथे महायज्ञ
सोमवारी विठ्ठल-रुक्मिणी आणि खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा
बीड/प्रतिनिधी
तालुक्यातील खडकीघाट येथे शनिवार, दि. 12 फेब्रुवारीपासून अंगिरस द्विरात्र महासोमयाग पर्वास प्रारंभ होत आहे. या सात दिवस चालणार्या महायज्ञास आणि धार्मिक कार्यक्रमांस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे.
भगवद्भक्ती आणि सद्गुरुभक्तीचा पवित्र संगम असलेल्या बीड तालुक्यातील श्री क्षेत्र खडकीघाट येथे सात दिवसीय महायज्ञ आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सद्गुरु सेलुकर महाराजांच्या कृपाशिर्वादाने बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वरजी सेलूकर यांच्या शुभहस्ते अंगिरस द्विरात्र महासोमयाग तथा विठ्ठल रुक्मिणी आणि खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. महासोमयाग 12 ते 18 फेब्रुवारी या सात दिवस होणार आहे तर मूर्ती प्राणप्रतिष्ठा 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. खडकीमध्ये सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. शिवाय 12 ते 17 फेब्रुवारीदरम्यान सांप्रदायिक कीर्तनं होणार आहेत. यामध्ये शनिवारी हभप भाऊसाहेब महाराज जोशी, रविवारी हभप पद्मनाभ महाराज व्यास, सोमवारी संदीपान महाराज हासेगावकर, मंगळवारी अमृताश्रम स्वामी महाराज, बुधवारी रोहिदास महाराज मस्के, गुरुवारी हभप मेंगडे महाराजांचे कीर्तन होणार आहे. ही सर्व सांप्रदायिक कीर्तनं सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत होणार आहेत. हभप महादेव महाराज चाकरवाडीकर यांची या धार्मिक कार्यक्रमांना विशेष उपस्थिती राहणार आहे.
मांजरसुंबा-चौसाळा रस्त्यावर रौळसगाव फाटा येथून 3 किमी अंतरावर खडकीघाट हे गाव असून या महायज्ञास मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, असं आवाहन अंगिरस द्विरात्र महासोमयाग सेवा समिती, खडकीघाट यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे.