बीड येथे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

बीड येथे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण- विविध क्षेत्रात कार्य केलेल्या अधिकारी, विद्यार्थ्यांचा सत्कार
बीड/वार्ताहर
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याहस्ते पार पडले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या सोहळ्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, राजकीय, शासकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर जिल्हावासियांना दिलेल्या संदेशात दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करत स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या अमर हुतात्म्यांना सर्वप्रथम अभिवादन करत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, दिनांक 13 ऑगस्टपासून देशभरात हर घर तिरंगा अभियान सुरु आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायत तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी शासकीय विभाग, सामाजिक, शैक्षणिक संस्था, पक्ष, संघटना अशा सामाजिक कार्यात असणाऱ्या प्रत्येक घटकाने एक होऊन अभियानासाठी काम केले आहे. हे अभियान घराघरापर्यंत पोहोचवण्यात विविध माध्यमांतून या सगळ्यांचा सहभाग मिळाला आहे. परिणामी आज जिल्ह्यातील प्रत्येक इमारतीवर तिरंगा डौलाने फडकतोय याचा मला आनंद होतो आहे, यासाठी प्रत्येक बीडवासियाचे त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकप्राप्त अविनाश साबळे या क्रीडापटूचे अभिनंदन केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी बीड नामदेव टिळेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मच्छिंद्र सुकटे, बीड तहसीलदार सुहास हजारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) डॉ. दयानंद जगताप,
ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. स्वातंत्र्योत्तर काळातील बीड जिल्ह्यातील कृषी विकास या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना, यामध्ये प्रथम क्रमांक सिद्धी सतीश दोन गाव (शिवाजी विद्यालय बीड) द्वितीय क्रमांक निर्मला प्रेम प्रकाश पांचाळ (जनता विद्यालय धारूर) तृतीय क्रमांक श्रद्धा परमेश्वर कांबळे (सोमेश्वर प्रशाला घाटनांदुर ता. अंबाजोगाई) यांचा सत्कार करण्यात आला.
