हजरत शहिंशाह वली दर्गा व परिसराच्या विकासासाठी दहा कोटींची तरतूद करा - अॅड. शेख शफिक भाऊ 

Beed

हजरत शहिंशाह वली दर्गा व परिसराच्या विकासासाठी दहा कोटींची तरतूद करा - अॅड. शेख शफिक भाऊ 

बीड/प्रतिनिधी

शासनाकडून तीर्थक्षेत्र विकास निधीच्या माध्यमातून राज्यभरातील सर्वधर्मीय अनेक तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो. त्या निधीतून विकास कामे करण्यात येतात. परंतु बीड शहरातील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेले ऐतिहासिक हजरत शहिंशाहवली दर्गा व परिसरासाठी मात्र निधी देण्यात येत नसल्याने येथील आवश्यक विकास कामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडून पडली आहेत. ही बाब लक्षात घेता एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून मागणी केली आहे की, येत्या बीड नगरपरिषद निवडणुकीपूर्वी हजरत शहिंशावली दर्गा व परिसराच्या विकासासाठी किमान दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा. जेणेकरून येथील विकासाचा बॅक लॉग भरून काढता येईल. 

याविषयी अधिक माहिती देताना पत्रकात नमूद केले आहे की, शहिंशाहवली दर्गा आणि येथील कब्रस्तानाला काही वर्षांपूर्वी कंपाउंड वॉल बनविण्यात आले. काही ठिकाणी हे कंपाउंड वॉल तुटले असून त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. ते दुरुस्त करणे, परिसरात पथदिवे लावण्याकरिता आवश्यक संख्येत विजेचे खांब लावण्यात यावे. आवश्यक त्या ठिकाणी हाय मास्ट दिवे लावण्यात यावे. दर्गाच्या बाजूला असलेल्या तलावात जवळपासच्या वसाहतींमधून येणाऱ्या गलिच्छ सांडपाण्याने पावसाळ्यात जमणारे चांगले पाणी खराब होऊ नये याकरिता तलावातील चारी बाजूंनी संरक्षक भिंती बांधणे. जवळपासच्या वसाहतीचे सांडपाणी वाहून नेण्याकरिता आवश्यक त्या संख्येत चांगल्या मजबूत नाल्यांचे निर्माण करणे. जेणेकरून नाल्यांद्वारे सांडपाणी लांब वाहून गेले तर ते घाण सांड पाणी तलावात जमा होणार नाही व पावसाळ्यात तलावात जमणारे पाणी स्वच्छ राहील. तलावातील पाणी इतर कामाकरिता उपयोगात आणता येईल. याशिवाय तलावाच्या जवळपास असलेल्या भूभागावर वेगवेगळ्या प्रकारची झाडे, फुलांची झाडे व हरळ लावून परिसर सुशोभित करणे. तेथेही आवश्यक त्या संख्येत पथदिवे व हाय मास्ट दिवे लावणे. जेणेकरून जवळपासच्या नागरिकांना आपल्या चिमुकल्यांसोबत येथे येऊन दोन घटका बसता येईल, वावरता येईल. अगोदरच शहरात लहान व मोठ्यांसाठी हवे तसे उद्यान व पर्यटन स्थळ नाही. शहिंशावली दर्गाच्या बाजूला असलेल्या तलावालगत जर उद्यान व पर्यटन स्थळाचे निर्माण करण्यात आले तर दर्गात येणाऱ्या भाविकांसोबतच पर्यटकांनाही हक्काचे पर्यटन स्थळ मिळेल. याकरिता हजरत शहिंशाहवली दर्गा व परिसरातील विकास कामासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी एआयएमआयएम चे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली असून लवकरच याविषयी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, अल्पसंख्यांक मंञी आणि पर्यटन मंत्री यांना निवेदन पाठविणार असल्याचे म्हटले आहे. 

Sharing

Visitor Counter