मादळमोही जिल्हा परिषद शाळेत लोकशाहीचे पाठ

मादळमोही जिल्हा परिषद शाळेत लोकशाहीचे पाठ
शालेय सरपंच व उपसरपंच पदासाठी विद्यार्थ्यांची निवडणूक;ग्रामस्थांतून कौतुक!
गेवराई/प्रतिनिधी
तालुक्यातील मादळमोही येथे जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत शालेय सरपंच व उपसरपंच निवडीसाठी अगदी निर्वाचन आयोग प्रमाणेच निवडणूक घेण्यात आली. निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाते याची माहिती मुलांना व्हावी म्हूणन मादळमोही शाळेत उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतमोजणी पर्यंतचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम राबविण्यात आला.
नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे धुमाकूळ बघून मुलांनाही मतदान करण्याची व निवडून येण्याची इच्छा मनात निर्माण झाली, मग काय मुलांची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षक माजेद अहेमद यांच्या संकल्पनेतून व इतर शिक्षकांच्या सहकार्यातून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर मतदान व मतमोजणी पर्यंतचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम शाळेत राबविण्यात आला.
लोकशाहीसाठी निवडणुका हा महत्त्वाचा भाग असून याची माहिती देण्यासाठी व निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाते याबाबत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया करून दाखविण्यात आली. निवडणुकीच्या प्रचार व प्रसार, आदर्श आचारसंहिता, मतदान प्रकिया व निकाल असे संपूर्ण कार्यपद्धतीबाबत अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आले तसेच लोकशाहीचे आणि राजकीय धडे देण्याचा अनोखा उपक्रम मादळमोही येथील जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आला. निवडणूकसाठी शिक्षकांनी सर्व साहित्य तयार केले व इयत्ता सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांनी केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकाऱ्यांची जबाबदारी उत्कृष्ठरित्या पूर्ण केली. सोमवारी पार पडलेल्या या निवडणुकीत ८८ टक्के विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि दुसऱ्या दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणूकीत शेख अफिफा कदीर शालेय सरपंच तर पठाण फरहान फेरोज उपसरपंच पदी निवडून आले. यावेळी मा.जिल्हा परिषद शिक्षण सभापती लगड बापू, मादळमोही गावाचे सरपंच राजेंद्र वारंगे, ग्रा.प. सदस्य अरुण वाघमारे, सोमनाथ पूरी केंद्रप्रमुख भारत गायकवाड तसेच शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अतिक पठाण, मुख्याध्यापक अतिया बेगम, शिक्षक सय्यद रहीम, सोहेल आफताब व माजेद अहेमद उपस्थित होते.