प्रकल्पग्रस्तांचे पाचव्या दिवशीही उपोषण, प्रशासन, निर्मिती कंपनी बेफिकीर

Beed

प्रकल्पग्रस्तांचे पाचव्या दिवशीही उपोषण, प्रशासन, निर्मिती कंपनी बेफिकीर

दोघांची प्रकृती झाली गंभीर, उपचारासाठी दिला नकार

पारस येथील अनेक प्रकल्पग्रस्त उपोषणामध्ये झाले सहभागी

परळी वैजनाथ/वार्ताहर

          औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य कार्यालयासमोर पाचव्या दिवशीही प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरूच आहे. प्रशासन आणि वीज निर्मिती कंपनी अत्यंत बेफिकीर झाल्याचे दिसून येत आहे. आज उपोणार्थींपैकी दोघांची प्रकृती गंभीर झाली असली तरी त्यांनी दवाखान्यात दाखल होऊन उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला असुन ते पुन्हा उपोषणाला बसले आहेत, तर पारस येथील सुमारे वीस प्रकल्पग्रस्त उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत.

         दिनांक 24 डिसेंबरपासून औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांनी उपोषण सुरू केले आहे. प्रकल्पग्रस्तांना कायम सेवेत सामावून घ्यावे, 45 वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तांचा निर्वाह भत्ता 30 हजार रुपये करावा, चंद्रपूर पाॅवर स्टेशन येथे प्रकल्पग्रस्तांचे दाखल करण्यात आलेल गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत आदी मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सुरू केले आहे. आज बुधवारी उपोषणाचा पाचवा दिवस आहे. या उपोषणाला अनेक संघटना आणि नागरीक पाठिंबा देत आहेत.

दोघांची प्रकृती झाली गंभीर

         आपल्या न्याय्य मागण्यांसाठी अनेक प्रकल्पग्रस्त गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यापैकी भगतसिंग ठाकूर आणि गुलाब अजमिर शेख या दोघांची प्रकृती गंभीर झाली आहे. आज त्यांची तपासणी केली असता डाॅक्टरांनी त्यांना उपचारासाठी दाखल होण्यास सांगितले होते मात्र त्यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार देत ते पुन्हा उपोषणाला बसले आहेत.दरम्यान आमच्या जिवीताला काही झाले तर त्यासाठी वीज निर्मिती कंपनी जबाबदार असेल ठाकूर आणि शेख यांनी यावेळी सांगितले.

 

पारसचे प्रकल्पग्रस्त उपोणाला

          पाच दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पारस येथुन सुमारे वीस प्रकल्पग्रस्त परळीत आले असुन तेही उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत. तर येत्या काळात बाहेरून आणखी प्रकल्पग्रस्त उपोषणामध्ये सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष सुधीर फड यांनी सांगितले.

Sharing

Visitor Counter