पोलिसांची चालाखी की नजर चूक

Beed

पोलिसांची चालाखी की नजर चूक

मजुराचा जीव घेणाऱ्या ट्रकचा नंबर एफ आय आर मध्ये बदल

बीड/वार्ताहर 

मजुराला धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला ट्रक पोलिसांनी सोडून दिला असा आरोप होत असताना या अपघात प्रकरणात असलेल्या ट्रक चा नंबर वेगळा आल्यामुळे ही पोलिसांची चालाखी आहे की नजरचूक असा प्रश्न उपस्थित होत असून याप्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की 24 डिसेंबर रोजी बार्शी नाका चौकामध्ये एका ट्रकने धडक देऊन प्रेम राव नामक मजुराला गंभीर जखमी केले होते सदर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मूड उत्तराखंड येथील प्रेम राव यांचे नातेवाईक आल्यानंतर 27 डिसेंबर रोजी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला परंतु या अपघात प्रकरणी तोपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर 27 डिसेंबर रोजी रात्री पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला परंतु या तक्रारी मध्ये ट्रकचा क्रमांक MH23UA4600 असा नमूद करण्यात आलेला आहे. अपघात स्थळी असलेले लोकांनी जो अपघात स्थळी व्हिडिओ घेतला फोटो घेतले त्यात गाडीचा नंबर वेगळा आहे त्यामुळे पोलिसांची ही चालाकी आहे की नजर चूक अशी शंका उपस्थित केली जात आहे आणि पोलिसांनी गाडी सोडून दिली या आरोपाला ही बळकटी मिळत आहे.

 

घटनास्थळी पंचनामा केला का?

ज्या ट्रकने मजुराचा बळी घेतल्यावर तो ट्रक आणि ट्रकचा चालक घटनास्थळी थांबलेला असताना घटनास्थळी पंचनामा केला की नाही? नसेल तर का केला नाही आणि पोलीस आल्यानंतर ट्रक निघून गेला कसा की सोडून दिला सोडला असेल तर हे कायद्याला धरून आहे का?

संपूर्ण घटनाक्रम संशयस्पद

अपघात घडल्यापासून ते घटनास्थळी अपघातात कारणीभूत असलेली ट्रक घटनास्थळावरून निघून जाण्यापर्यंत व लोकांनी पाहिलेला ट्रक नंबर व एफआयआर मध्ये असलेला ट्रक नंबर दिसत असलेला फरक यामुळे संपूर्ण घटनाक्रम संशयाला जागा निर्माण करतो.

 

अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

एका गरीब मजुराचा जीव गेलेला असताना किमान त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून या प्रकरणातील हकीकत पुराव्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून या प्रकरणात योग्य ती पावले उचलून "त्या" कुटुंबाला न्याय मिळेल असे आश्वासन दिले.

Sharing

Visitor Counter