येणाऱ्या पिढ्यांना जगता यावे याचे स्वप्न पहावे!

Beed

येणाऱ्या पिढ्यांना जगता यावे याचे स्वप्न पहावे!

डॉ. कुंडलिक खेत्री : बार्टी केंद्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

बीड / प्रतिनिधी

सध्य स्थितीला देशात भारतीय संविधानाला अपेक्षित असलेली अंलबजावणी होत नाही. समाजाला धार्मिक मुद्यात गुंतवून ठेवले जात आहे. धर्माधर्मात, माणसामाणसात, प्रांतवादात कलह लावला जातो आहे. परिणामी येणार काळ अतिशय कठीण होणार आहे. त्यामुळे युवकांनी संविधानाला अभिप्रेत असलेलेच कार्य करावे. त्यासाठी येणाऱ्या पिढ्यांना मोकळेपणाने जगता यावे याचे स्वप्न पाहून नेहमी लढत रहावे असे मत डॉ. कुंडलिक खेत्री यांनी व्यक्त केले.

           बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यताप्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. कुंडलिक खेत्री बोलत होते. यावेळी कार्यकारी संपादक सुनिल डोंगरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

            पुढे बोलतांना डॉ. कुंडलिक खेत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांनो तीच माणसे जिवंत राहतात ज्यांनी बदल घडविण्यास आपले जीवन समर्पित केले. महापुरुष होणे कठीण असते. सावित्रीमाई फुले शिकल्या नसत्या तर आज महिला कुठे असत्या याचे महिलांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे. थोतांड काव्य, निर्थक गोष्टी, अंधश्रद्धा, दैववाद यापासून दूर रहा, खरंतर बीड सारख्या ठिकाणी राहुल वाघमारे यांनी एक अतिशय दर्जेदार केंद्र उभारुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बार्टीच्या माध्यमातून एक नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रातून आगामी काळात अनेक विद्याथी घडतील. विद्यार्थांनी या संधीचे सोने करुन आपले करिअर घडवावे. माणूस म्हणून घेत असताना संवेदना चेतना जागी असणं गरजेचं आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय द्या. जोपर्यंत खालचा आवाज मोठा होणार तोपर्यंत बदल घडणे अशक्य आहे. युवकांनी सामाजिक परिस्थितीचे निरीक्षण करावे. केवळ जिवंत असून चालत नाही, त्यासाठी जिवंत असावे लागते. सामाजिक आंदोलने समजून घेत, त्या आंदोलनाला सपोर्ट करायला शिका. असे मत डॉ. कुंडलिक खेत्री यांनी व्यक्त केले.

           हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे सचिव राहूल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र प्रमुख प्रा.अविनाश वडमारे, ग्रंथपाल सचिन काकडे, प्रा.अमोल क्षीरसागर, सहाय्यक प्रा.अर्चना आठवले,वरिष्ठ लिपिक विनोद जोगदंड, कनिष्ठ लिपिक दिलीप गायकवाड, व्हिडीओ ग्राफर राहुल शिंदे, सहाय्यक दीपक वाघमारे,सहाय्यक गजानन खेत्री यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

Sharing

Visitor Counter