जातीपातीच्या विळख्यात हरवलेली माणुसकी..!

Beed

जातीपातीच्या विळख्यात हरवलेली माणुसकी..!

आजच्या आधुनिक भारतात आपण तंत्रज्ञानाच्या, शिक्षणाच्या, आणि विकासाच्या नावाने अनेक झेप घेतल्या आहेत. मात्र, दुर्दैवाने, जातीपातीचे राजकारण आपल्या समाजाच्या मुळावर उठले आहे. एका काळी माणुसकीचा गंध असलेल्या गावखेड्यांत आज जात, धर्म, आणि वर्गाचा भेदभाव अधिक गडद झाला आहे.पूर्वी गावखेड्यांमध्ये कोणत्याही पाहुण्याला आपलेसे मानून, प्रेमाने आणि आपुलकीने पाहुणचार करण्याची परंपरा होती. कोणतीही जात, धर्म विचारात न घेता सर्वजण एकत्र येऊन जीवनाचा आनंद घेत असत. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. आज पाहुणचार करताना पहिला प्रश्न विचारला जातो - “तो कोणत्या जातीचा?”ही स्थिती समाजाच्या मानसिकतेतील मोठा बदल दाखवते. शहरांच्या तुलनेत गावांमध्ये हा प्रकार अधिक प्रकर्षाने जाणवतो. कधी एकत्र सण साजरे करणारे लोक आज एकमेकांशी न बोलण्यास प्राधान्य देतात.जातीवाद हा केवळ व्यक्तीगत पातळीवर नाही, तर राजकीय पातळीवरही खोलवर रुजला आहे. आरक्षणाच्या नावाखाली किंवा जातीय नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे समाजात तणाव निर्माण होत आहे. या नेत्यांना जातीच्या नावाने मते मागायला वेळ असतो, मात्र गरीब कष्टकऱ्यांच्या अन्न-वस्त्र-निवाऱ्याची चिंता करण्यासाठी वेळ नसतो.शहरांमध्ये तांत्रिक विकास दिसतो, पण गावखेड्यांतील गरीब कुटुंब अजूनही दोन वेळेच्या जेवणासाठी संघर्ष करत आहेत. शिक्षणासाठी साधनं नाहीत, रोजगारासाठी गावागावात भटकंती सुरू आहे.आता काळ आला आहे, माणुसकीला जातीय विळख्यातून सोडवण्याचा. जात, धर्म, वर्ग हे फक्त एक सामाजिक ओळख म्हणून ठेवा, पण त्यावर माणुसकीचा बळी जाऊ देऊ नका."माणूसकी हाच आपला धर्म आणि आपली जात" या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन, आपण आपल्या समाजाची आणि देशाची सुधारणा करू शकतो.एकत्र चहा घेणारे शेजारी आज का बोलत नाहीत? सुख-दुःखात मदतीसाठी धावणारी माणसं आता एकमेकांपासून का दूर गेली?लहानपणी खेळत वाढलेली मुलं आज एकमेकांकडे संशयाने का पाहतात? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी जिवंत ठेवणं आजची खरी गरज आहे.आपल्या गावांना, समाजाला पुन्हा एकत्र आणायचं असेल, तर जातीचा विळखा सोडून, माणुसकीचं बळ वाढवायला हवं. आपण लहानसहान बाबतीत जात विचारणं थांबवलं, तरच मोठा बदल शक्य आहे.“माणूस म्हणून माणसाशी वागा, जात, धर्म, आणि वर्ग यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपा..!”

 

 विशेष संपादकीय...!

Sharing

Visitor Counter