बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!

बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शासनाकडून विविध सवलती लागू!
बीड, प्रतिनिधी
राज्य शासनाने खरीप हंगाम २०२६ मध्ये उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळाचा प्रथम कळ (Trigger-1) लागू झाला असून, शासनाच्या निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांना विविध सवलती आणि उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. राज्यातील एकूण २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, त्यात बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील 'या' ११ तालुक्यांत दुष्काळ
शासन निर्णयानुसार बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर आणि वडवणी या ११ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा प्रथम कळ लागू करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना मिळणार या महत्त्वाच्या सवलती..!
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये शासनाने विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जांच्या वसुलीस स्थगिती आणि कृषी पंपांच्या चालू वीजबिलात ३३.५ हॉर्सपॉवरपर्यंत क्षमतेच्या वीजपंपांसाठी सूट यांचा समावेश आहे.तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना प्राधान्य, आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.दुष्काळग्रस्त गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांची वीजजोडणी खंडित न करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश..!
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. तसेच पीक परिस्थितीचा आढावा घेऊन पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
