अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा; दोन आरोपींना अटक, २७ तोळे सोने व ८५८ ग्रॅम चांदी जप्त

Beed

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई..!

अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा; दोन आरोपींना अटक, २७ तोळे सोने व ८५८ ग्रॅम चांदी जप्त

बीड प्रतिनिधी 

अंबाजोगाई शहरातील बंद घर फोडून तब्बल ५३ तोळे सोन्याचे दागिने, पावणेदोन किलो चांदी आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २७ तोळे (२७० ग्रॅम) सोने आणि ८५८ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात २० सप्टेंबर २०२६ रोजी घरफोडीची तक्रार दाखल करण्यात आली होती. फिर्यादी हे आपल्या कुटुंबीयांसह घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील ५३ तोळे सोन्याचे दागिने, पावणेदोन किलो चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.२५ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत या घरफोडीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. 

अमर काकासाहेब थोरात आणि त्याच्या दोन साथीदारांनी ही घरफोडी केली असून, ते चोरीचे सोने विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांनी परळी परिसरात सापळा रचून अमर काकासाहेब थोरात (वय २३, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदार जगजीतसिंग अचलसिंग दुधानी (वय ३२, रा. शिवाजी चौक, परळी) याचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दुधानी यालाही तातडीने ताब्यात घेतले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान या दोघांनी मंगलसिंग हिरासिंग बावरी याच्या साथीने घरफोडी केल्याची कबुली दिली. गुन्ह्यासाठी बावरी याची युनिकॉर्न मोटारसायकल वापरण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.

ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अंबाजोगाईचे सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णू सानप, गोविंद भताने, अर्जुन यादव, विकास राठोड, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, अश्वीनकुमार सुरवसे, गोविंद राख, चालक अतुल हराळे तसेच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पांडुरंग काळे आणि हनुमंत चादर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.फरार आरोपीचा शोध आणि चोरीला गेलेल्या उर्वरित मुद्देमालाचा तपास अंबाजोगाई शहर पोलीस करीत आहेत.

 

५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला.!

या घरफोडीचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या पथकाकडे सोपविण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या. पोलिसांनी अभिलेखावरील संशयितांची माहिती गोळा करण्यासह परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातील एका फुटेजमध्ये तीन संशयित दुचाकीवरून जात असल्याचे दिसून आले. त्याआधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

 

२७ तोळे सोने आणि ८५८ ग्रॅम चांदी हस्तगत..!

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून चोरीतील २७ तोळे सोने आणि ८५८ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत. या गुन्ह्यातील तिसरा संशयित मंगलसिंग हिरासिंग बावरी हा अद्याप फरार असून, अंबाजोगाई शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

Sharing

Visitor Counter