तमाशा कलावंताच्या मुलांचे संगोपण करणार्या सेवाश्रम परिवारास मराठवाडा जनता विकास परिषदेकडून आर्थिक मदत

तमाशा कलावंताच्या मुलांचे संगोपण करणार्या सेवाश्रम परिवारास मराठवाडा जनता विकास परिषदेकडून आर्थिक मदत
बीड (प्रतिनिधी)
शिरुरकासार तालुक्यातील ब्रह्मनाथ येळंब येथील सेवाश्रम परिवारास मराठवाडा जनता विकास परिषद शाखेकडून रोख 16 हजारांची आर्थिक मदत आणि हळदी मसाला तसेच बीड येथील कुटे ग्रुपच्या तिरूमला ऑइलच्या वतीने सोयाबीन ऑईल वितरित करण्यात आले. बीड येथे रविवारी संपादक राजेंद्र आगवान, संपादक सर्वोत्तम गावरस्कर यांच्यासह पत्रकार अतुल कुलकर्णी, सौ.रागिणी आगवान, सौ.रंभा शितोळे, अविनाश वाघीरकर, सुशील देशमुख यांच्या हस्ते ही मदत वितरित करण्यात आली. यावेळी जनता विकास परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ब्रह्मनाथ येळंब येथे सुरेश राजहंस व सौ.मयुरी राजहंस हे दाम्पत्य गत 9 वर्षापासून सेवाश्रम हा प्रकल्प चालवत आहेत. समाजातील वंचित घटकातील तमाशा कलावंत तसेच पाल ठोकून व्यवसाय करणार्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी धडपडणार्या कार्यकर्त्यांचा हा परिवार आहे. या ठिकाणी सध्या 50 हून अधिक विद्यार्थी वास्तव्यास आहेत. कोरोना संकटकाळातही सेवाश्रम परिवाराकडून या विद्यार्थ्यांचे पालन पोषण केले जात आहे. सेवाश्रमच्या या कार्याला बळ देण्यासाठी सहकार्य म्हणून मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने रविवारी (दि.29) बीड येथे संपादक तथा जनता विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगवान यांच्या निवासस्थानी सुरेश राजहंस यांना रोख 16 हजारांची आर्थिक मदत तसेच हळदी मसाला वितरित करण्यात आला. तर बीड येथील कुटे ग्रुपच्या तिरूमला ऑइलच्या वतीने सोयाबीन ऑईल बॉक्स वितरित करण्यात आला. याप्रसंगी राजहंस यांनी मनोगत व्यक्त करत सेवाश्रम परिवाराबद्दल माहिती दिली. यावेळी संपादक सर्वोत्तम गावरस्कर, संपादक राजेंद्र होळकर, यांच्यासह पत्रकार अतुल कुलकर्णी, अविनाश वाघीरकर, सुशील देशमुख, सौ.रंभा शितोळे, सौ.रागिणी आगवान आदि उपस्थित होते.
