बीडमधील कलावंतांनी वेशभूषा परिधान करून रंगभूमी सुरु करण्यासाठी पालकमंत्र्यांना दिले निवेदन

बीडमधील कलावंतांनी वेशभूषा परिधान करून रंगभूमी सुरु करण्यासाठी पालकमंत्र्यांना दिले निवेदन
बीड, १३ ऑगस्ट (प्रतिनिधी)
रंगभूमी सुरु करून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मागण्यासाठी काल दि. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान बीडमधील तब्ब्ल सव्वाशे कलावंतांनी बीड शहरातील राष्ट्रवादी भवनासमोर वेशभूषा परिधान करून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन दिले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत काम भेटत नसल्यामुळे कलावंत कर्जबाजारी झाले तर दुसऱ्या लाटेत हाताला काम नसल्याने कलावंताच्या पदरी दारिद्र्य आले आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि आक्टोबर या तीन महिन्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. यादरम्यान कलाकार वर्गास मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. मात्र सांस्कृतिक कार्यक्रमांवर अजूनही बंदी आहे. कोरोना विषयक नियमांचे बंधन घालून लवकरात लवकर रंगभूमी सुरु करा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी. राज्यभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधाना शिथिलता मिळाली आहे. पण दुसरीकडं मात्र सांस्कृतिक कार्यक्रमांवर अजूनही बंदी आहे. यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. असं निवेदनाद्वारे कलावंतांनी सांगितले आहे. पालकमंत्री मा. धनंजय मुंडे यांनी कलावंतांच्या मागण्यांचे हे निवेदन स्वीकारून लवकरात लवकर यावर विचार करून निर्णय घेऊ असे आश्वासन कलावंतांना दिले आहे.