10 वी 12 वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलत गुण मिळण्याचे प्रस्ताव 30 एप्रिल पर्यंत सादर करण्याचे आवाहन

10 वी 12 वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलत गुण मिळण्याचे प्रस्ताव 30 एप्रिल पर्यंत सादर करण्याचे आवाहन
बीड/वार्ताहर
बीड जिल्हयातील सर्व शाळा, विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये यांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्राध्यापक यांनी सन 2021-22 या वर्षातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ.10 वी ) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.12 वी ) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यासाठी पात्र खेळाडूंनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे विहित नमुन्यातील ( प्रपत्र अ,ब, इ ) आदीसह जोडणे. इयत्ता 10 वी व 12 वी चे स्वतंत्र ( वेगवेगळे ) प्रस्ताव दि. 30 एप्रिल 2022 पर्यंत संबधित कार्यालयास कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी , बीड यांनी केले आहे.
कोविड-19 या रोगामुळे उदभवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सन 2021-22 या वर्षात, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ.10 वी ) साठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत, इयत्ता 7 वी व 8 वी मध्ये सदर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घ्यावा, तसेच सन 2021-22 या वर्षात उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ.12 वी ) साठी प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्याच्या बाबतीत इयत्ता 12 वी पुर्वी म्हणजेच इयत्ता 9 वी व 10 वी मधील क्रीडास्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सन 2021-22 मध्ये क्रीडा गुणांची सवलत देण्याच्या सूचना क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाचे आयुक्त यांनी केल्या आहेत.
तसेच एकविध खेळ संघटनाद्वारा आयोजित स्पर्धा मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचे प्रस्ताव हे स्वतंत्र सादर करावेत. सदर खेळाडूंची शिफारस त्याच वेळेस करण्यात येईल ज्या वेळी सदर एकविध संघटनेमार्फत शासन निर्णयातील परिशिष्ठ 3 व 5 मधील नमूद सर्व कागदपत्रांची परिपुर्तता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे वेळेत केलेली असेल तर, अन्यथा विभागीय शिक्षण मंडळास ( बोर्डास ) सिफारस करण्यात येणार नाही, याची संबंधीतांनी नोंद घ्या. वेळेत प्रस्ताव प्राप्त न झाल्यास सदर प्रस्तावांचा सिफारशी करिता विचार होणार नाही, याची नोंद घ्यावी, त्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही.अधिकच्या माहिती साठी श्री. रमाकांत डिंगणे, मो.क्र.9923744959 क.लिपीक, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,बीड यांना संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अरविंद विद्यागर हे कळवित आहेत.
