स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी मात्र बसस्थानकावरील चोऱ्यांकडे दुर्लक्ष का?

Beed

स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी मात्र बसस्थानकावरील चोऱ्यांकडे दुर्लक्ष का?

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी उल्लेखनीय असताना बस स्थानकातील चोर सापडत नाहीत हेच दुर्दैव !

बीड प्रतिनिधी 

स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जबरी चोरीप्रकरणी मोठी कामगिरी करत दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून १० मोबाईल फोन्स, एक दुचाकी अशा एकूण २.८७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे काही प्रमाणात शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्याची शक्यता आहे मात्र तथापि, बीड बस स्थानकावर रोजच होणाऱ्या चोरीच्या घटनांना मात्र अद्यापही लगाम लागलेला नाही. रोज हजारो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करत असताना त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल, इतर मौल्यवान वस्तू चोरीला जात आहेत. विशेष म्हणजे, अशा घटना वारंवार घडत असून देखील या चोऱ्यांचा तपास लागलेला नाही, आणि चोरट्यांचे रिंग लीडर अद्याप फरारच आहेत.स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या रकमेच्या चोरीच्या तपासात यश मिळवले असले तरी, बस स्थानकावर दररोज होणाऱ्या चोऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. 

बीड शहर व शिवाजीनगर परिसरात मोटारसायकलवरून येत रस्त्यावरून चालत जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीतील दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 2 लाख 87 हजार रुपये किंमतीचे 10 मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

फिर्यादी अभिषेक दिनकर केदार (वय 20, रा. संत ज्ञानेश्वर नगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री 9.15 वाजता पिंपरगव्हाण रोडवरील गायत्री दुकानाजवळ फोनवर बोलत घरी जात असताना, काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी त्यांचा मोबाईल हिसकावून नेला. यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. 210/2025 भा.न्या.सं. कलम 309(4), 3(5) अन्वये नोंद करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा छडा लावण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक श्री. नवनित काँवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुशांत सुतळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरु केला. दिनांक 28 एप्रिल रोजी खात्रीशीर माहितीवरून समर्थ मंगल कार्यालयासमोर सापळा रचण्यात आला. त्या ठिकाणी दोन इसम मोटारसायकलवर आले असता त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळण्याचा प्रयत्न करु लागले, मात्र त्यांना पथकाने ताब्यात घेतले.

तपासात त्यांनी त्यांची नावे 1. आदित्य बंकट नरवडे (वय 19, रा. बालेपीर, ता.जि. बीड)2. नामदेव रामप्रसाद डोईफोडे (वय 19, रा. ईट, ता.जि. बीड)अशी सांगितली. विचारपूस केली असता, त्यांनी व त्यांच्या इतर एका साथीदाराने मिळून वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून रिअलमी, सॅमसंग अल्ट्रा, विवो, ओपो, पोको इत्यादी कंपनीचे एकूण 10 मोबाईल आणि स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

त्यांच्याविरोधात खालील गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे

1. शिवाजीनगर – गु.र.नं. 210/2025 कलम 309(4), 3(5)

2. शिवाजीनगर – गु.र.नं. 165/2025 कलम 304(4)

3. बीड शहर – गु.र.नं. 40/2025 कलम 303(2)

4. बीड शहर – गु.र.नं. 67/2025 कलम 309(4), 3(5)

सदर गुन्ह्यात तिसरा एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्या अटकेमुळे मोबाईल चोरीचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पो.नि. उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुशांत सुतळे, पोह/मारुती कांबळे, पोह/विकास राठोड, बाळकृष्ण जायभाये, देविदास जमदाडे, पोशि/नारायण कोरडे, अश्विनकुमार सुरवसे, चापोह/नितीन वडमारे यांनी मिळून केली आहे.

 

 

 

Sharing

Visitor Counter