शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सर्वंकष माहितीकोष तयार करावे

Beed

शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सर्वंकष माहितीकोष तयार करावे

बीड/प्रतिनिधी 

राज्य शासनाच्या सेवेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष दरवर्षी अद्ययावत करण्यात येणार आहे. या माहितीकोषामध्ये नियमित आस्थापनेवरील व नियमित्तेतर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययी आस्थापनेवरील, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी इ.) तसेच तदर्थ तत्वावर नेमणूका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती 1 जुलै 2020 या संदर्भ दिनांकास अनुसरुन गोळा करण्यात येणार आहे. जिल्हयातील शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्याची कार्यवाही जिल्हा सांख्यिकी कार्यालय, (जिल्हा सांख्यिकी कार्यालय, पद्मजा बिल्डींग, सुभाष रोड, बीड फोन नं. 02442-222371) मार्फत करण्यात येणार आहे. सर्वकष माहितीकोष तयार करणेकरिता आवश्यक असणारी ऑनलाईन संगणकीय आज्ञावली महाराष्ट्र शासनाच्या www.mahasdb.maharashtra.gov.in या वेबसाईटवर User ID व Password दि. 1 सप्टेंबर 2020 ते दि. 15 सप्टेंबर 2020 या कालावधीत प्राप्त करुन घेणेसाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन  केले आहे.

सर्वंकष माहितीकोषाकरिता असणाऱ्या ऑनलाईन आज्ञावलीमध्ये माहिती नोंदणी तात्काळ पुर्ण करण्यात यावी. आहरण व संवितरण अधिकाऱ्याच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वेबसाईटवर नोंदणी करुन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडे सादर करावी. सदर माहिती सादर केल्यानंतर अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून माहिती प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल. 

सदर प्रमाणपत्र डिसेंबर 2020 च्या जानेवारी २०२१ देय वेतन देयकासोबत नसल्यास व नोंदवलेली माहिती बरोबर असल्याबाबत माहे मार्च 2021 च्या एप्रिल २०२१ मध्ये देय वेतन देयकासोबत प्रमाणपत्र जोडले नसल्यास वेतन देयके कोषागार कार्यालय-उप कोषागार कार्यालय येथे पारित केली जाणार नाहीत याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी असे जिल्हा सांख्यिकी अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

Sharing

Visitor Counter