बीडमध्ये पेट्रोल-डिझेल टंचाई;नागरिक त्रस्त..!

बीडमध्ये पेट्रोल-डिझेल टंचाई;नागरिक त्रस्त..!
जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं आहेत कुठे?;प्रशासनावर प्रश्नचिन्ह
बीड प्रतिनिधी
बीड शहरात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत असून, काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण झाल्याची स्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. इंधन टंचाईसारख्या संवेदनशील विषयावर प्रशासनाकडून अपेक्षित ती तत्परता आणि गांभीर्य दिसून येत नसल्याची नागरिकांची भावना आहे. विशेष म्हणजे, जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं आहेत कुठे? असा प्रश्न उपस्थित होत असून या परिस्थितीत प्रशासनाची भूमिका निष्क्रिय असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, काही पेट्रोल पंपांवर बंदोबस्त नसल्याने गर्दी आणि तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पेट्रोल पंपावर पोलीस कर्मचारी देण्याची मागणी होत आहे.जिल्हा पुरवठा विभागाकडून इंधन पुरवठा सुरळीत असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अनेक पेट्रोल पंप बंद असल्याचे चित्र आहे. यामुळे इंधन उपलब्ध असूनही वितरण थांबवले जात आहे का? असा संशय व्यक्त केला जात आहे.
याशिवाय, काही पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा असूनही तो ग्राहकांना दिला जात नसल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने तपास करून, साठा असूनही विक्री न करणाऱ्या पंपांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.एकूणच, वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणणे अत्यावश्यक बनले आहे.








