बालेपीर प्रभाग क्रमांक १२ मधील कचराकुंडी मुळे शाळेतील विद्यार्थी, नागरिक बेजार !

बालेपीर प्रभाग क्रमांक १२ मधील कचराकुंडी मुळे शाळेतील विद्यार्थी, नागरिक बेजार !
घंटागाडी नियमित पाठवावी - शेख मोहसीन
बीड/प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये बालेपीर भागात असलेल्या शाळेच्या कॉर्नरवर दर दोन-चार दिवसाला मोठ्या प्रमाणात कचरा साचतो परंतु बीड नगरपालिकेकडून नियमितपणे उचलला जात नसल्याने या कचऱ्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिकही बेजार झाले आहेत. या प्रभागात कचरा घेऊन जाणारी घंटागाडी दररोज नियमितपणे पाठविण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी दिलेल्या पत्रकातून केली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, परिसरात असलेली लाल बहादूर शास्त्री शाळा येथे शिक्षण घेण्यासाठी दररोज अनेक विद्यार्थी येतात मात्र शाळेत जाऊन शिक्षण घेण्याअगोदर विद्यार्थ्यांना कॉर्नर ला असलेल्या या कचऱ्याची दुर्गंधी घ्यावी लागते नंतर शाळेत जाऊन शिक्षण घेता येते. येथील कचऱ्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा म्हणून शाळा प्रशासनाने ही अनेकदा नगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत परंतु नगरपालिका प्रशासनाने त्याची कधीही गांभीर्याने दखल न घेतल्याने या जागी ना कचराकुंडी ठेवण्यात आली ना येथील कचरा दररोज उचलण्यात येतो. तसेच प्रभाग क्रमांक १२ मध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून घंटागाडी ही बंद करण्यात आली आहे. याविषयी माहिती घेतली असता कळाले की, घंटा गाडी तर नगरपालिकेकडे उपलब्ध आहे परंतु ती चालविण्यासाठी चालक उपलब्ध नाही. निव्वळ एक चालक नसल्यामुळे अनेक नागरिकांना या कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी नगरपालिकेने लवकरात लवकर घंटागाडी वर चालक नियमितपणे उपलब्ध करावा व नियमितपणे दररोज प्रभागातील कचरा घेऊन जाण्याकरिता घंटागाडी पाठविण्यात यावी. अन्यथा नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी पत्रकातून दिला आहे.
