भीषण अपघात;अंबाजोगाईजवळ कार पलटी होऊन दोन ठार, चार जखमी

भीषण अपघात;अंबाजोगाईजवळ कार पलटी होऊन दोन ठार, चार जखमी
अंबाजोगाई प्रतिनिधी
आडस-अंबाजोगाई रस्त्यावरील उमराई पाटीजवळ आज (बुधवार) भीषण अपघात झाला. समोर अचानक आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात इर्टिगा कार पलटी होऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबद्दल मिळालेली प्राथमिक स्वरूपाची माहिती अशी की,मयतांची नावे खय्युम अब्बास अतार (४५) व शौकत अहेमद शेख (४६) अशी आहेत. अपघातग्रस्त सर्वजण माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील असून, अंबाजोगाईकडे लग्नकार्याकरिता निघाले होते.घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, उमराई पाटी शिवारातील दत्त मंदिराजवळ एमएच ०५ सीव्ही ९१८६ क्रमांकाची कार समोर अचानक आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अपघातानंतर दुचाकीस्वार दुचाकीसह पसार झाला.या अपघातात कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असून, जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.दरम्यान, या अपघातामुळे आडस-अंबाजोगाई मार्गावरील अपुऱ्या रस्ते रूंदीकरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या उमराई ते सनगाव शिवारापर्यंत रस्ता चौपदरी करण्यात आलेला असून, पुढील आडसपर्यंत रस्ता तातडीने चौपदरी करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.








