बार्शी नाका परिसरात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न; वाहतूक शाखेचे नियोजन शून्य

बार्शी नाका परिसरात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न; वाहतूक शाखेचे नियोजन शून्य
एसपी साहेबांच्या गाडीला ट्राफिक थांबवून कर्मचारी विशेष सोय करतात मात्र सर्वसामान्यांचा काय?
बीड प्रतिनिधी
शहरातील वाहतूक शाखेच्या नियोजनशून्य कारभारामुळे बार्शी नाका ते तेलगू नाका तसेच बार्शी नाका ते शिवाजी महाराज चौक या मुख्य मार्गांवर वाहतूक कोंडीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. दररोजच्या या समस्येकडे वाहतूक शाखेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, सोमेश्वर मंदिर परिसरात आज सकाळपासून बार्शी नाका रोडवर एक तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीत पोलिसांच्या तीन वाहने देखील अडकून पडली होती. बार्शी नाका चौक, तेलगाव रोड, मुक्ता लॉन्स परिसरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
वाहतूक पोलीस रस्त्यावर असले तरी ते फक्त गाड्यांचे चलन फाडताना दिसतात. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुठलाही प्रयत्न होताना दिसत नाही. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका, ऑफिसला जाणारे कर्मचारी या सर्वांना याचा मोठा फटका बसत आहे.
नागरिकांनी वेळोवेळी या समस्येकडे लक्ष वेधूनही वाहतूक शाखेकडून कसलाच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, आता वाहतूक शाखेने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.








