स्पा सेंटरच्या आड वेश्याव्यवसाय; नाशिकच्या पीडितेची सुटका, चालकाला अटक

स्पा सेंटरच्या आड वेश्याव्यवसाय; नाशिकच्या पीडितेची सुटका, चालकाला अटक
बीड प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सारडा कॅपिटलच्या तळघरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर बीड शहर पोलिसांनी कारवाई केली. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास डमी ग्राहक पाठवून करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली असून प्रमोद सदाशिव शेळके (रा. नेकनूर, ता. बीड) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
स्पा सेंटरचे नाव ‘ब्लीस’ असून मागील काही दिवसांपासून या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी डमी ग्राहकाला एक हजार रुपये देत आत पाठविले. डमी ग्राहकाकडून पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी छापा मारत कारवाई केली.या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, मनोज परजणे, अशपाक सय्यद, सुशेन पवार, सचिन अलगट आणि रेश्मा कवळे यांनी केली.








