गेवराई तालुक्यात चिमुरडीवर अत्याचार; महिला आयोगाच्या सदस्या अॅड चव्हाणांनी दिली भेट

गेवराई तालुक्यात चिमुरडीवर अत्याचार; महिला आयोगाच्या सदस्या अॅड चव्हाणांनी दिली भेट
आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या पोलिसांना सूचना तर पोलिस अधीक्षकांशी साधला थेट संवाद
गेवराई/प्रतिनिधी
तालुक्यामध्ये एका सहा वर्षाच्या मुलीवर दोन बायकांच्या दादल्याने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाच्या सदस्या अॅड. संगीता चव्हाण यांनी थेट घटनास्थळी भेट घेऊन दोन दिवसांमध्ये आरोपीला अटक करण्याच्या सूचना गेवराई पोलिसांना तर दिल्याच शिवाय या अनुषंगाने थेट पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले असता पोलिस अधीक्षकांनी दोन दिवसांमध्ये आरोपीला पकडण्याचे आश्वासन अॅड. संगीता चव्हाण यांना दिले.
दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांच्या समवेत शेतकरी संघटना युवा पूजा मोरे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख फरजाना ताई शेख यांच्या सहा पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य महिला आयोगाच्या सदस्य एडवोकेट संगीता चव्हाण घटनास्थळी भेट देणार हे समजताच विविध सामाजिक संघटनांनी त्यांना गराडा घालून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे संगीता चव्हाण यांना रितसर निवेदन देऊन आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. विविध सामाजिक संघटनांच्या भावनेचा आदर करीत राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांनी गेवराई पोलिसांना सूचना देऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याचे सांगितले. दरम्यान आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, घडलेला प्रकार अत्यंत संतापजनक असून मानवतेला काळिमा फासणारा आहे. अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आरोपीला कठोरात कठोर शासन देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या घटनेच्या अनुषंगाने पीडित चिमुरडीच्या पालकांना हवी ती मदत मी करण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी वचन दिले.
पोलिस अधीक्षकांनी स्वतः संतप्त जमावाला शांत केले!
राज्य महिला आयोगाच्या सदस्या एडवोकेट संगीता चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली असता संतप्त ग्रामस्थांनी संगीता चव्हाण यांना तात्काळ आरोपीस अटक करून कठोर शासन करण्याची मागणी केली असता चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट पोलीस अधीक्षकांना मोबाईल द्वारे संपर्क साधून संतप्त जमावाला शांत करण्यासाठी स्पीकर ऑन करून पोलीस अधीक्षकांना भावना व्यक्त करण्यास सांगितल्या असता पोलिस अधीक्षकांनी दोन दिवसांमध्ये आरोपीला अटक करण्यात येईल, तेव्हा कोणीही कायदा हातात न घेता सर्वांनी शांत व्हावे, असे आवाहन केले.
कोणत्याही लोकप्रतिनिधीने घटनास्थळी भेट न दिल्याने संताप!
गेवराई तालुक्यातील या दुर्दैवी घटनेमुळे कोणत्याही संवेदनशील माणसाच्या भावना दुखावल्या शिवाय राहत नाही. परंतु जनतेचे सेवक म्हणून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी घटना घडून पाच दिवस झाले तरीही घटनास्थळी अद्याप भेट दिली नाही. अशा भावना संतप्त ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या सहा वर्षाच्या पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांना मानसिक आधार देण्याची नितांत गरज आहे. असे असताना देखील निवडणुकीच्या काळामध्ये याच गोरगरिबांचे उंबरठे झीजवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणे टाळल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.