भारतीय स्वातंत्र्यलढ्याची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन अनमोल ठेवा - जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

भारतीय स्वातंत्र्यलढ्याची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन अनमोल ठेवा - जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा
तीन दिवसीय प्रदर्शनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजन
दिनांक 15 ते 17 सप्टेंबरदरम्यान अहिल्याबाई सांस्कृतिक सभागृह येथे भेट देण्याचे आवाहन
बीड/वार्ताहर
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनातून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अनमोल ठेवा चित्रस्वरूपात एकत्रित पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्यलढ्याचे विविध टप्पे या प्रदर्शनातून उलघडत आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये व सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी फणी कुमार, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, सहाय्यक संचालक, प्रकाशन विभाग उमेश उजगरे आदि मान्यवर उपस्थित होते.
दिनांक 15 ते 17 सप्टेंबर 2022 या कालावधीत अहिल्याबाई सांस्कृतिक सभागृह, भाजी मंडई रोड येथे सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे छायाचित्र प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनात मराठवाडा मुक्ती संग्राम आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील (सन 1857 ते 1947) विविध महत्त्वाच्या घडामोडी आणि थोर स्वातंत्र्य सेनानी यांची जीवनगाथा छायाचित्र आणि माहिती स्वरुपात मांडण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची माहिती चित्र स्वरुपात पाहण्यासाठी या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनास भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा माहिती कार्यालय, बीड व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सहकार्याने वतीने करण्यात आले आहे. यावेळी छायाचित्र प्रदर्शन व माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाच्या वतीने आयोजित विशेष पुस्तक प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तांबवेश्वर कला पथकाच्या शाहिरी पोवाड्यांच्या जयजयकारात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या भारतमाता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रदर्शन पाहण्यासाठी विविध शालेय विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी सेल्फी घेतली. स्वाक्षरी फलकावर मान्यवरांनी स्वाक्षरी केली. या तीन दिवसीय प्रदर्शनादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 16 सप्टेंबर रोजी भारत सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाच्या वतीने राष्ट्रीय पोषण माह निमित्त सकस आहाराचे प्रदर्शन व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
