मुख्याधिकारी साहेब, बीड शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये दोन आठवड्यांपासून पाण्यासाठी भटकंती !

Beed

मुख्याधिकारी साहेब, बीड शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये दोन आठवड्यांपासून पाण्यासाठी भटकंती !

निदान पाण्याचे टँकर तरी चालू करा - शेख मोहसीन

बीड/प्रतिनिधी

शहरातील बालेपीर भागातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून नळांना पाणी नाही. यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांचे पाण्याविना हाल होत असून बीड नगरपरिषद चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी म्हणून नाव मिळविलेले उमेश ढाकणे यांनी निदान या भागात पाण्याचे टँकर तरी चालू करून पाण्यासाठी नागरिकांची होत असलेली तारांबळ थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

                याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, तेरा दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक १२ मध्ये नळांना पाणी आले होते. यानंतर तेरा दिवस उलटून ही आजपर्यंत नळांना पाणी सोडण्यात आले नाही. याविषयी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून बोललो असता प्रत्येकांकडून वेगवेगळी कारणे दिली गेली. यामुळे कोणालाही पाणीपुरवठ्याचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रभाग क्रमांक १२ मधील बालेपीर परिसरात असलेल्या रोशनपुरा, इंद्रप्रस्थ कॉलोनी, गुलशन नगर, काज़ी नगर, नय्यर खान कालोनी, भगवान नगर, पंडित नगर, ग्रामसेवक कॉलोनी, अक्सा कॉलोनी, हिदायत नगर, कालिंकानगर, ईदगाह नगर, वाहेद नगर, भारतभूषण नगर, खातीजा नगर, गोरेवस्ती, शिक्षक कॉलोनी, लोकाशा नगर, चतुराई नगर या भागात गेल्या दोन आठवड्यांपासून नळांना निर्जळी आहे. यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून पाणी उपलब्ध करण्याकरिता मोठ्या प्रमाणात तारांबळ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन एक तर लवकरात लवकर नळांना पाणी सोडा नाहीतर किमान पाण्याचे टँकर तरी प्रभाग क्रमांक १२ मध्ये सुरू करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

Sharing

Visitor Counter