प्रकल्पग्रस्तांचे चौथ्या दिवशीही उपोषण, अनेकांची प्रकृती खालावली

प्रकल्पग्रस्तांचे चौथ्या दिवशीही उपोषण, अनेकांची प्रकृती खालावली
महानिर्मिती आणि प्रशासनाची बघ्याची भूमिका, आमचे बळीच हवेत का - प्रकल्पग्रस्तांचा सवाल
परळी वैजनाथ/प्रतिनिधी
महानिर्मिती कंपनीला आमचे बळीच हवे असतील तर आम्ही बळी देण्यासाठी तयार आहोत अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाकडे संबंधित जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून आंदोलन चिघळले तर संबंधित जबाबदार राहतील असा इशारा महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान आज चौथ्या दिवशीही उपोषण सुरू असुन काही जणांची प्रकृती बिघडली आहे. दरम्यान मागण्या मान्य नाही झाल्या तर प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबीयही आंदोलनात उतरणार असल्याचे समजते.
औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य कार्यालयासमोर शनिवारपासून प्रकल्पग्रस्तांनी उपोषण सुरू केले आहे. प्रकल्पग्रस्तांना कायम सेवेत सामावून घ्यावे, 45 वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तांचा निर्वाह भत्ता 30 हजार रुपये करावा, चंद्रपूर पाॅवर स्टेशन येथे प्रकल्पग्रस्तांचे दाखल करण्यात आलेल गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत आदी मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सुरू केले आहे. आज मंगळवारी उपोषणाचा चौथा दिवस असुन अनेक उपोषणार्थींची प्रकृती बिघडली आहे.
महानिर्मिती कंपनी आणि प्रशासन सुस्तच₹
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शनिवारपासून आमरण उपोषणाला बसले असुन आज मंगळवारी उपोषणाचा चौथा दिवस आहे. मात्र अद्याप महानिर्मिती कंपनी आणि प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे उपोषणार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
न्याय देण्यासाठी प्रशासनाला आमचे बळीच हवे असतील तर आम्ही बळी देण्यासही तयार आहोत अशी संतप्त भावना उपोषणार्थींनी व्यक्त केली आहे तर मागण्या तातडीने मार्गी लागल्या नाहीत तर नाइलाजाने आम्हालाही आंदोलनात उतरावे लागेल असा इशारा प्रकल्पग्रस्तांच्या नातेवाईकांनी दिला आहे.संतापाची भावना दरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला आज चार दिवस झाले असुन आणि नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असुनही अद्याप महानिर्मिती कंपनी आणि प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्या नातेवाईकांसह जनतेमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषण सुरू असुन विविध क्षेत्रातील अनेकांनी भेटी देऊन उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला असल्याचे प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष सुधीर फड यांनी सांगितले.
