इमामपूर रोड परिसरात अवैध मुरूम उत्खननाचा सुळसुळाट; महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

इमामपूर रोड परिसरात अवैध मुरूम उत्खननाचा सुळसुळाट; महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
बीड प्रतिनिधी
इमामपूर रोड आणि परिसरातील चराटा फाटा, घोडका राजुरी, काकड हिरा, तळेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन सुरू असून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचे समोर येत आहे. स्थानिकांकडून हा प्रश्न उपस्थित होत आहे की, या अवैध उत्खननाला पाठबळ कोणाचे आहे? संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.तलाठी आणि मंडळ अधिकारी हे सर्व प्रकरण गप्प राहून बघत असल्याचे आरोप होत आहेत. विचारणा केली असता, हे मुरूम उत्खनन शासकीय कामासाठी सुरू असल्याचा दावा केला जातो. मात्र, शासकीय कामासाठी महसूल बुडवून असा मुरूम उपसा होऊ शकतो का, हाच संशोधनाचा विषय बनला आहे.
याआधी पोलीस प्रशासनाने तीन हायवा, एक पोकलेन आणि एक जेसीबी जप्त केली होती. मात्र, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून कायदेशीर चौकटीत सोडून दिल्याची चर्चा आहे. जर उत्खनन केलेल्या क्षेत्रावर योग्य दंड आकारला गेला असता, तर मुरूम माफियांची हिंमत झाली नसती, असेही स्थानिक सांगत आहेत.शहरातून आणि पोलीस अधीक्षक कार्यालय समोरून अवैध मुरूम वाहतूक करणारे बिना नंबर हायवा खुलेआम फिरत आहेत. या वाहनांमुळे एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण असणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.अवैध उत्खनन रोखण्यासाठी कडक कारवाई होणे गरजेचे असून, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी यांच्या भूमिकेची चौकशी होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा या भागातील नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होऊन शासनाचा मोठा तोटा होईल हे मात्र नक्कीच..!
महसूल विभाग आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह..!
महसूल विभागाकडून मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी बुडवली जात असून, या प्रकरणात अधिकारीही हात मोकळे ठेवून बसल्याचा आरोप होतो आहे. शासनाचा महसूल बुडाला तरी चालेल, पण आमच्या रॉयल्टीचा वाटा मिळावा, अशी अधिकाऱ्यांची मानसिकता असल्याचीही चर्चा सुरू आहे.
